ठाणे - आईला भेटण्यासाठी सातासमुद्रापार असलेल्या लेकानं तब्बल १६ देशांचा अनोखा प्रवास केला आहे. विराजित मुंगळे असं या मुलाचं नाव असून त्यांनी लंडन ते मुंबई असा कारने प्रवास केला. विराजित यांना या प्रवासासाठी ५९ दिवस लागले. या काळात जवळपास १८ हजार किलोमीटरचा रस्त्याने प्रवास केला. १६ देशांमधून सुरु झालेला हा प्रवास ठाण्यात येऊन थांबला आहे.
विराजित मुंगळे हे एक ब्रिटीश भारतीय आहेत. त्यांनी आईला सरप्राईज देण्यासाठी लंडनहून बाय कारने मुंबई गाठली. विराजित हे फ्लाईटनेही येऊ शकले असते परंतु एक थरारक अनुभव घ्यायची इच्छा असल्याने त्यांनी हा कारने मुंबईत यायचे ठरवले. विराजित यांनी लंडनहून ठाणे यात १८३०० किमी प्रवास कारने केला. या प्रवासात १६ देश, ज्यात जर्मनी, रशिया आणि चीनचाही समावेश आहे. प्रत्येक देशात त्यांनी जेवणाचा, राहण्याचा अनुभव घेतला.
विराजित ऐतिहासिक सिल्क रोडशी प्रेरित आहेत. त्यामुळे अशीच रोड ट्रिप करण्याची त्यांची इच्छा होती. या रस्ते प्रवासात विराजित यांनी दिवसाला ४०० ते ६०० किमी अंतर दिवसाला कापले. त्यासोबतच सुरक्षेच्या कारणास्तव रात्रीचा प्रवास करणेही टाळले. मात्र इतका मोठा प्रवास करून घरी पोहचताच आईचा ओरडाही विराजित यांना ऐकावा लागला. इतक्या देशातून प्रवास करण्यासाठी विराजित यांनी आधीच सर्व परवानग्या घेऊन ठेवल्या होत्या. सोबतच ट्रिपसाठी ऑफिसहून २ महिन्याची सुट्टीही घेतली परंतु हा प्रवास इतका सोप्पा नव्हता.
रस्त्यात अनेक ठिकाणी उंच पर्वत, कमी ऑक्सिजन यामुळे त्यांना आजारपणाचाही सामना करावा लागला. ५२०० मीटर उंच आणि खराब वातावरणामुळे काही ठिकाणी अडथळे निर्माण झाले. त्यानंतर ठाण्यात पोहचून विराजित हे त्यांच्या आईला भेटले. आता ठाण्याहून पुन्हा लंडनाला जाण्यासाठी ते लाँग ड्राईव्ह करत जाणार नाही. आता ते त्यांची चारचाकी लंडनला शिपमधून पाठवतील आणि स्वत: विमानाने लंडनला जाणार आहेत.