ओडिशातील केंद्रपाडा जिल्ह्यातील एका गावात रातोरात गावकरी लखपती बनले. या लोकांच्या बँक खात्यावर अचानक पैसे पाठवले. जवळपास ४० बँक खात्यांवर इतकी मोठी रक्कम जमा करण्यात आली होती. ज्यावेळी बँकेत पैसे जमा झाल्याचा मेसेज खातेधारकांना मिळाला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. परंतु इतके पैसे कुठून आले, कुणी पाठवले याबाबत ते गोंधळात पडले. बँक खात्यावर पैसे आल्यानंतर दुसऱ्या दिवशी बँकेत लोकांची गर्दी झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण केंद्रपाडा जिल्ह्यातील औल ब्लॉकमधील ओडिशा ग्रामीण बँकेच्या बाटीपाडा शाखेतील आहे. या बँकेच्या खातेधारकांच्या खात्यावर मोठ्या प्रमाणात पैसे जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे हे पैसे काढण्यासाठी लोकांनी बँक गाठली. या काळात काही लोकांनी पैसे काढले तर काहींना रिकाम्या हाती घरी परतावे लागले.
खातेधारकांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज आला. त्यात हजारांपासून २ लाखांपर्यंत रुपये क्रेडिट झाल्याची माहिती देण्यात आली. जेव्हा लोकांनी हे मेसेज पाहिले त्यांनी बँकेत पैसे काढण्याची गर्दी केली. कधी नव्हे इतकी लोकांची गर्दी बँकेत झाल्याने अधिकाऱ्यांना संशय आला. पैसे काढण्यासाठी लोकांची गर्दी वाढतच चालली होती. त्यामुळे बँक खात्यांमध्ये जमा झालेल्या रक्कमेवर शंका आल्याने अधिकाऱ्यांनी तात्काळ लोकांना पैसे काढून देण्याची सुविधा बंद केली.
सुरुवातीला काहींनी पैसे काढले, परंतु गर्दी वाढल्याने झाली शंका
सुरुवातीला काही लोक बँकेत पोहचले त्यांनी खात्यावरून पैसे काढले, सगळे काही रोजच्य सारखे सुरळीत सुरू होते. परंतु जेव्हा बँकेत पैसे काढण्यासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी वाढली तेव्हा बँक अधिकाऱ्यांना संशय आला. त्यानंतर बँक खाती तपासली असता त्यात रात्री अचानक मोठमोठी रक्कम प्रत्येकाच्या बँक खात्यात जमा झाल्याचे कळाले. त्यानंतर ही रक्कम संशयास्पद असल्याने बँक अधिकाऱ्यांनी अनिश्चित काळासाठी पैसे काढण्याची सुविधा बंद केली. सध्या या प्रकरणाचा बँक अधिकारी तपास करत आहेत. अखेर लोकांच्या खात्यात हे पैसे कुणी टाकले त्याचा काही सोर्स आहे का याची चौकशी सुरू आहे.