भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देवी-देवतांची मंदिरे आहेत. यातील अनेक मंदिरे आश्चर्यकारकही आहेत. कारण या मंदिराच्या तयार करण्यामागच्या अनेक रंजक कथाही आहेत. असंच एक वेगळं मंदिर आहे. आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या मंदिरांमध्ये देवी-देवतांची पूजा केली जाते असं पाहिलं असेल. पण एक असंही मंदिर जिथे बेडकाची पूजा केली जाते.
हे अनोखं मंदिर उत्तरप्रदेशच्या लखीमपूर-खीरी जिल्ह्यातील ओयल परिसरात आहे. हे भारतातील असं एकमेव मंदिर आहे जिथे बेडकाची पूजा केली जाते. असे मानले जाते की, हे ठिकाण ओयल शैव संप्रदायाचं प्रमुख केंद्र होतं आणि येथील शासक भगवान शिवाचे भक्त होते. इथे मंडूक यंत्रावर आधारिक एक प्राचीन शिव मंदिरही आहे.
हे क्षेत्र ११व्या शतकापासून ते १९व्या शतकापर्यंत चाहमान शासकांच्या अधिपत्याखाली होतं. चाहमान वंशाचे राजा बख्श सिंहने या अनोख्या मंदिराचं निर्माण केलं.
असे सांगितले जाते की, या मंदिराची वास्तु परिकल्पना कपिला येथील एका महान तांत्रिकाने केली होती. तंत्रवादावर आधारित या मंदिराची संरचना आपल्या विशेष शैलीमुळे लोकांना आपल्याकडे आकर्षित करते.
असेही सांगितले जाते की, हे मंदिर साधारण २०० वर्ष जुनं आहे. मान्यता आहे की, दुष्काळ आणि पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तीपासून बचावासाठी या मंदिराचं निर्माण करण्यात आलं होतं. इथे दिवाळीसोबतच महाशिवरात्रीला देखील भाविकांची मोठी गर्दी असते.