ते म्हणतात ना प्रेमाला काही वयाचं बंधन नसतं. पण हेही तितकंच खरं आहे की, सामान्यपणे प्रेम समान वयाच्या किंवा थोड्या फार अंतराच्या लोकांमध्ये होतं. पण इंडोनेशियातील एक अनोखी प्रेम कहाणी समोर आली आहे. इथे एका २७ वर्षीय तरूणीने तब्बल ८३ वर्षांच्या व्यक्तीसोबत लग्न केलं आणि दोघेही याला पहिल्या नजरेचं प्रेम सांगत आहेत.
इतकेच नाही तर ज्या ८३ वर्षाच्या व्यक्तीसोबत या तरूणीने लग्न केलं त्या व्यक्तीच्या मोठ्या मुलाचं वय ५१ वर्षे आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या तरूणीच्या वडिलांचं वय देखील या मुलाच्या वयापेक्षा कमी आहे. म्हणजे नूरेनी नावाची ही तरूणी तिच्या वडिलांच्या वयापेक्षा कमी वयाच्या मुलाची सावत्र आई झाली आहे.
mothership.sg वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, असे सांगितले जात आहे की, २७ वर्षी नूरेनी काही कामासाठी ८३ वर्षीय नवरदेव सुर्दीगोकडे गेले होते. ही दोघांचीही पहिली भेट होती. नरेनीने सांगितले की, 'आम्हाला पहिल्या नजरेतच प्रेम झालं. त्यानंतर आम्ही काहीना काही कारण शोधत भेटत राहिलो' सुदीर्गो म्हणजे नवरदेवाला ८ नातवंडे आहेत. त्यामुळे हे प्रेम समजून घेणं अर्थातच इतरांसाठी जरा अवघड आहे.
सुर्दीगोने सांगितले की, 'मी आता वयाच्या अशा टप्प्यावर आहे, जिथे मला रोमॅंटिक रिलेशन असं वाटत नाही. पण नूरेनी मला भेटल्यावर मला प्रेमाची जाणीव झाली. त्यामुळे मी तिच्याकडे प्रेम व्यक्त केलं आणि लग्नासाठी विचारणा केली. तिनेही लग्नाला लगेच होकार दिला'.
दोघांच्याही लग्नासाठी नूरेनीच्या घरातूनही परवानगी होती. पण सुदीर्गोच्या मुलांना याबाबत थोडी चिंता होती. नूरेनीने एका स्थानिक वेबसाइटला सांगितले की, 'मला माझ्या पतीच्या मुलांनी अनेकदा हा प्रश्न विचारला की, तू तुझ्या समवयस्क व्यक्तीसोबत लग्न करत नाहीयेस?'.
सुदीर्गोची मुलगी टार्टीने प्रसारमाध्यमांना सांगितले की, 'मी स्वत: नूरेनीसोबत बोलले आणि तिने मला स्पष्ट सांगितले की, तिचं माझ्या वडिलांवर प्रेम आहे. त्यांचं प्रेम बघून आम्हीही या लग्नाला होकार दिला'. यात आणखी एक आश्चर्यकारक बाब म्हणजे नूरेनीचं हे पहिलंच लग्न आहे तर सुदीर्गोची याआधी तीन लग्ने झालीत.