भुवनेश्वर (ओदिशा) : सरकारी अधिकारी, आमदार, मंत्री यांनी नकार दिल्यानंतर जिद्द आणि अथक परिश्रम केले तर ओदिशातील आदिवासी शेतकरी हरिहर बेहरा आणि त्यांच्या भावाने घडवले तसे परिवर्तन साकार होते. बेहरा यांनी ३० वर्षे कठोर परिश्रम करून पहाड़ कापून तीन किलोमीटरचा रस्ता तयार केला. एक वेळ अशी होती की, राज्याचे मंत्री आणि इतर सगळे तेथे रस्ता तयार होऊ शकत नाही, असे म्हणत होते; परंतु हरिहर बेहरा यांच्या जिद्दीने इतिहास निर्माण केला.हरिहर बेहरा भुवनेश्वरपासून ८५ किलोमीटर दूर नयागढ जिल्ह्यातील तुलुबी गावात राहतात. हे गाव बरेच मागासलेले आहे. त्याच्या जवळपास कोणताही रस्ता नाही. त्यामुळे तेथील रहिवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. लोक ये-जा करण्यासाठी जंगलातील रस्ता वापरत. हा रस्ता सुरक्षित नाही म्हणून हरिहर बेहरा यांनी रस्ता बनवण्याचा निर्णय घेतला. जंगलातून शहरात किंवा बाज़ारात जाणे कठीण झाले होते. पहाडी आणि जंगली भागांमुळे जंगली प्राणी आणि विषारी सापांचा धोका असायचा. लोकांना त्यालाही तोंड द्यावे लागायचे. या पार्श्वभूमीवर हरिहर बेहरा यांनी रस्ता केला जावा म्हणून आधी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. अधिकाऱ्यांनी अशक्य म्हणून हात वर केले. राज्याच्या मंत्र्यानेही नकार दिला. सगळीकडूनच नकार मिळाल्यावर हरिहर बेहरा यांच्या पाठीशी त्यांचा भाऊ उभा ठाकला. दोघांनी मिळून मोठमोठे खडक तोडले.
आमदाराकडून नकार स्थानिक आमदाराकडे या पहाडातून रस्त्याची मागणी केल्यावर ते म्हणाले की, हा रस्ता येथे कधीच होऊ शकणार नाही. हे ऐकल्यापासून बेहरा यांनी रस्ता बनवण्याचे काम स्वत:च सुरू केले, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.