थंडी पडणं, अचानक पावसाच्या सरी तर कधी ऊन पडतं. वातावरणातील या बदलांचा माणसांच्या शरीरावर परिणाम होऊन आरोग्याच्या वेगवेगळ्या तक्रारी उद्भवतात. त्याचप्रमाणे रस्त्यावरील प्राण्यांनाही वातावरणातील बदलांचा त्रास होतो. पण मुक्या जनावरांच्या त्रासाबद्दल फारसा विचार केला जात नाही. आपल्याला बरं नसेल किंवा कुटूंबातील एखादी व्यक्ती आजारी असेल तर आपण लगेच दवाखाना गाठतो पण प्राण्यांच्या बाबतीत असं दिसून येत नाही. वातावरणातील बदलांचा सामना करत, कोणाकडेही तक्रार न करता प्राणी आपलं जीवन जगत असतात.
समाजातील हाताच्या बोंटावर मोजण्या इतकेच लोक स्वतःप्रमाणे प्राण्यांचाही विचार करतात. अभिजीत नावाच्या एका माणसाने प्राण्यांना बाहेरच्या वातावरणाचा होणारा त्रास लक्षात घेता एक अनोखी शक्कल लढवली आहे. अभिजीतने घरातील टिव्हीच्या रिकाम्या खोक्यांचा वापर करून रस्त्यावरील कुत्र्यांसाठी एक घर तयार केलं आहे. जेणेकरून थंडीच्या वातावरणात या घरात बसल्याने कुत्र्यांना ऊब मिळेल.
न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार ३२ वर्षीय अभिजीत यांनी सांगितले की, ''पाळीव प्राण्यांना सगळ्या प्रकारच्या सुविधा आणि आराम मिळतो. पण रस्त्यावरच्या कुत्र्यांना मात्र अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणून मी त्यांच्यासाठी काहीतरी करायचं ठरवलं. त्यासाठी रात्री उशीरा रस्त्यांवर फिरून कुत्रे कोणत्या ठिकाणी आणि कसे विश्रांती घेतात याचे निरिक्षण केले.''
पुढे त्यांनी सांगितले की, गेल्या ५ वर्षात भंगारातील सामानापासून मी ५० कामाच्या नवीन वस्तू तयार केल्या आहेत. टाकाऊपासून टिकाऊ तयार करण्याची आवड मला असल्यामुळे आता माझ्या ओळखीतले लोक भंगारातील कचरा फेकून न देता माझ्याकडे देतात. माझी कल्पना आवडल्यानंतर अनेक पशु वैद्यकिय तज्ज्ञांनी माझ्याशी संपर्क केला.''
लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, अन् आता १० रूपयात लोकांना पोटभर जेवण पुरवतोय 'हा' अन्नदाता
अभिजीत यांच्या कार्यामुळे स्थानिक लोक त्यांना एखादा अविष्कार असल्याप्रमाणे त्यांना ओळखतात. जे खराब आणि टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक वस्तू तयार करतात. त्यांनी आतापर्यंत महिलांच्या सुरक्षेसाठी टॉर्च आणि कोरोनाकाळात हँण्ड सॅनिटायजेशनचे मशिन तयार केले होते.