तुम्ही सकाळी उठलात आणि उठल्यानंतर तुम्हाला तुम्ही कुठे आहात असा प्रश्न तुम्हाला पडला तर तुम्ही काय कराल? तुम्ही में कहाँ हुँ? असा हिंदी पिक्चर स्टाईल डायलॉग म्हणाल. डॉक्टर तुमचं चेकअप करून म्हणतील, तुम्हारी याददाश खो गई है. पण हे फक्त सिनेमात घडतंच असं नव्हे. रिअल लाईफमध्येही असं घडू शकतं. खरंतर असं घडलंय...
तुम्हाला विश्वास बसणार नाही ही अमेरिकेतील टेक्सास मधल्या एका महाशयांची मेमरी एका रात्रीत गेली. सकाळी उठल्यावर ऑफिसला निघण्याऐवजी ते स्कुल बॅग भरु लागले. त्यांची मेमरी तब्बल २० वर्षांनी मागे गेली. इंडिया टाईम्समध्ये लिहिलेल्या वृत्तानुसार ३७ वर्षाचे डॅनियल पोर्टर व्यवसायाने हिअरिंग स्पेशालिस्ट आहेत. ते रात्री आरामात झोपले होते. सकाळी त्यांना जाग आली तेव्हा त्यांना आजूबाजूचे काहीच ओळखता येत नव्हते. ते आपल्या पत्नीला आणि मुलीलाही ओळखु शकत नव्हते. त्यांनी ऑफिसला जाण्याऐवजी शाळेची बॅग भरायला सुरुवात केली.
त्यांची स्मृती २० वर्ष मागे गेली होती. ते स्वत: ला शाळेतील विद्यार्थी समजत होते. त्यांना त्यांच्या पत्नीकडे बघुन असंही वाटत होतं की तिने त्यांना किडनॅप केलंय. त्यांनी स्वत:ला आरशात बघितलं. त्यांना स्वत:वरच विश्वास बसत नव्हता की १७ व्या वर्षी ते इतके लहान कसे दिसू शकतात.त्यांची बायको त्यांना घेऊन माहेरी गेली. त्यांची मुलगी त्यांना सर्व आठवून देण्याचा प्रयत्न करत होती पण त्यांना फक्त त्यांचे स्वत: चे घर आठवत होते. ते घरातील पाळीव प्राण्यांकडे पाहुन लहान मुलांप्रमाणे घाबरत होते.
सुरुवातीला डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबाला सांगितले की, हा शॉर्ट टर्म मेमरी लॉस आहे. २४ तासांमध्ये त्यांना सर्व काही आठवू लागेल. पण या गोष्टीला आता वर्ष झालं. डॅनियल यांना गेल्या २० वर्षातलं काहीही आठवत नाही. डॉक्टर म्हणत आहेत की, त्यांना कसलातरी जबरदस्त मानसिक धक्का बसल्यामुळे असे झाले आहे. जानेवारी २०२०मध्ये डॅनियल यांची नोकरी गेली होती. त्यानंतर त्यांना आपले घर विकावे लागले होते. त्यातच त्यांना स्लिप डिस्कचाही त्रास झालेला. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.