(प्रातिनिधीक छायाचित्र - Image Credit : freepik.com)
बॅंकेवर दरोडा कसा टाकावा? असं सर्च केल्यावर ३८ वर्षीय सायमन जोनस खऱ्या आयुष्यात एक बॅक लुटायला गेला. बरं गेला तर गेला या दरोड्यासाठी तो त्याच्या प्रेयसीची कार घेऊन गेला. त्यावेळी त्याची प्रेयसी कुत्र्याला फिरायला घेऊन गेली होती. त्याच्या प्रेयसीला याचा जराही अंदाज नव्हता की, तिचा बॉयफ्रेन्ड तिची कार घेऊन बॅंकेवर दरोडा टाकायला जाणार आहे. सगळंकाही सायमनच्या प्लॅननुसार सुरु होतं, पण पोलिसांपासून बचाव कठीण नाही तर अशक्य होता. आता सायमन ४० महिने तुरुंगातील भाकरी खाणार आहे.
चोरीसाठी लाइनमध्ये लागला
सायमन जोनास हा बॅंक लुटण्यासाठी पूर्ण तयारीने पोहोचला होता. त्याने सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे मास्क, हातमोजे, काळा चष्मा हे सगळं केलं होतं. इतकेच नाही तर तो चोरीसाठी ग्राहकांप्रमाणे १५ मिनिटे बॅंकेच्या लाइनमध्येही मोठ्या सभ्यपणे उभा होता.
शस्त्र म्हणून काय नेलं?
जोनसकडे शस्त्र म्हणून एअरफ्रेशनरची बॉटल होती. पण त्याने कॅशिअरला हे सांगून घाबरवलं की, या बॉटलमध्ये तेजाब आहे. जर त्याने पैसे दिले नाही तर तेजाब त्याच्यावर फेकेल अशी धमकीही त्याने दिली. कॅशिअरही घाबरला आणि त्याने जोनसला ३७० पाउंड(33 हजार रुपये) दिले. सोबतच त्याला ट्रॅकिंग डिवाइस लावलेलं १ हजाराचं बंडलही दिलं.
कसा पकडला गेला?
जोनसचा चोरी करण्याचा अंदाज फारच बाळबोध होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला काही तासातच आपल्या जाळ्यात घेतलं. सायमन जोनसला ४० महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सायमनने काउंडी डरहम येथील बिशप ऑकलॅंडमधील नटवेस्ट बॅंकेची ब्रॅंच लुटण्याचा प्रयत्न केला होता. काही लोक म्हणाले की, या व्यक्तीची मानसिक स्थिती ठिक नाहीये. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या बॉटलने त्याने कॅशिअरला धमकी दिली त्यात तेजाबही नव्हतं.