अनेकदा अडचणीच्या काळात आपल्याला पैशांची गरज असते. तेव्हा वाईट विचार मनात येतात. परंतु आजही अनेक प्रामाणिक माणसं आपल्याला आढळतील जे दुसऱ्यांचं नुकसान करून कधीही स्वत: सुखी होत नाहीत. कर्जात बुडालेल्या एका महिलेने असं कृत्य केले आहे जे ऐकून तुम्हालाही तिचा अभिमान वाटेल. नेमकं या महिलेसोबत काय घडलं आणि सोशल मीडियात नेटिझन्स तिचं कौतुक का करतायेत हे जाणून घेऊया.
कर्जात असलेली ही महिला KFC शॉपमध्ये चिकन सँडविच आणण्यासाठी गेली होती. तेव्हा तिला पार्सल पॅकेटमध्ये ४३ हजार रुपये सापडले. या महिलेने टेकअवे बॅगमधून चिकन सँडविच पार्सल घेत घरी गेली. पार्सल उघडताच तिच्या बॅगमध्ये अचानक ४३ हजार रुपये पाहून तिला धक्का बसला. त्यानंतर महिलेने ते पैसे संबंधितांना परत करण्यासाठी शॉप गाठलं. या महिलेच्या प्रामाणिकपणाचं पोलिसांनीही कौतुक केले.
जोआने ओलिवर जॉर्जिया ही अमेरिकेत राहणारी महिला आहे. तिने लंचसाठी चिकन सँडविच ऑर्डर केले. मात्र सँडविचच्या बॅगमध्ये तिला ४३ हजार सापडले. डेलीस्टारच्या वृत्तानुसार, जोआने सध्या कर्जात बुडालेली आहे. मात्र अचानक सापडलेल्या ४३ हजारानंतरही तिने प्रामाणिकपणा सोडला नाही. हे पैसे पाहून तिने पोलिसांना फोन केला. या पैशात मला शॉपिंग करता आले असते किंवा कारची टाकीही पूर्ण भरता आली असती असं मज्जामस्करीत जोआने म्हटलं.
एका मुलाखतीत जोआनेने सांगितले की, मी नोटा मोजायला सुरुवात केली त्यात एकूण ४३ हजार रुपये होते. मी लगेच ते पैसे लिफाफ्यात परत ठेवले. त्यानंतर लिफाफा बंद केला. तोपर्यंत अधिकारीही पोहचले होते. जॅक्सन पोलीस तपासात समोर आले की, KFC डिपॉझिट रक्कम चुकीनं जोआनेच्या बॅगेत ठेवली गेली. पोलिसांनी फेसबुकवरून जोआनेचे आभार मानले. फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं की, जोआने यांनी प्रामाणिकपणा दाखवला त्याचसोबत केएफसीच्या मॅनेजरची नोकरी वाचवली. सोशल मीडियावर युजर्स जोआनेचं कौतुक करत आहेत.