कर्नाटकमधील एका व्यक्ती गेली १७ वर्ष एका जंगलात जुन्या झालेल्या पांढऱ्या अॅम्बेसेडर कारमध्ये राहत होता अशी एक हटके कहाणी समोर आली आहे. पण सर्वांपासून दूर जात जंगलात राहण्याची नामुष्की या व्यक्तीवर का आली? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यामागची कहाणी देखील रंजक आहे. चंद्रशेखर गौडा नावाचा ५६ वर्षीय व्यक्ती गेल्या १७ वर्षांपासून कर्नाटकातील जंगलात राहत आहे. चंद्रशेखर यांनी शेतीसाठी कर्ज घेतलं होतं आणि त्याची परतफेड करु न शकल्यानं त्यांनी आपली १.५ एकर जमीन गमावली होती. त्यानंतर ते जंगलात आपल्या अॅम्बेसेडर कारमध्येच राहू लागले होते. त्यांनी समाजापासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या १७ वर्षांपासून ते आपल्या कारमध्येच राहात आहेत आणि आज त्यांची कार एकदम जुनी झाली आहे.
कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सुलिया येथील एका जंगलात चंद्रशेखर राहत आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जंगलात जवळपास ४ ते ५ किमीतर पायी अंतर कापावं लागतं. त्यानंतर बांबूंना बांधलेलं एक प्लास्टिकचं छप्पर नजरेस पडतं. त्याखाली त्यांनी आपली अॅम्बेसेडर कार उभी केली आहे आणि त्यातच ते गेल्या अनेक वर्षांपासून राहात आहेत. विशेष म्हणजे कारमध्ये असलेला रेडिओ आजही सुरू आहे.
चंद्रशेखर आता वयोमानामुळे खूप खंगले आहेत आणि त्यांची प्रकृती देखील ठीक नसते. बऱ्याच काळापासून त्यांनी दाढी आणि केस देखील कापलेले नाहीत. त्यांच्याकडे कपड्यांचे फक्त दोन जोड आहेत आणि एक जोड रबरी चपला एवढंच त्यांचं स्वत:चं सामान आहे. जंगल आणि त्यांची कार हेच त्यांचं आता विश्व झालं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार चंद्रशेखर यांच्याकडे नेकराल केमराजे नावाच्या गावात १.५ एकर शेतजमीन होती. यात ते सुपारीचं पीक घ्यायचे. सारंकाही व्यवस्थित सुरू होतं. २००३ साली त्यांनी एका सहकारी बँकेतून ४० हजार रुपयांचं कर्ज घेतलं होतं. पण ते फेडू न शकल्यानं बँकेनं त्यांच्या शेत जमीनीचा लिलाव केला होता आणि पैसे वसूल केले होते. या घटनेनं चंद्रशेखर पूर्णपणे खचले गेले आणि त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं. चंद्रशेखर यांच्याकडे राहण्यासाठी त्यांचं घर देखील नव्हतं. मग त्यांनी आपल्या अॅम्बेसेडर कारमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. अॅम्बेसेडर कार घेऊन ते आपल्या बहिणीकडे गेले होते. पण तिथं त्यांचं भांडण झालं आणि ते कार घेऊन दूरवर जंगलात जाऊन राहू लागले. त्यांनी सर्वांशी संपर्क तोडला होता. जंगलात एका जागी त्यांनी आपली कार पार्क केली तिथंच राहायला सुरुवात केली. पावसापासून बचावासाठी त्यांनी एक प्लास्टिकचं छप्पर बांधलं आणि गेल्या १७ वर्षांपासून ते याच जागी राहात आहेत.
गेल्या १७ वर्षांपासून ते कारमध्ये एकांतात राहात आहेत आणि जवळच्या नदीतच ते अंघोळ करतात. जंगलातील सुक्या बांबूंच्या लाकडापासून ते टोपल्या बनवू लागले आणि त्याची विक्री बाजारात करुन त्याबदल्यात तांदूळ, साखर आणि इतर किराणा सामान घेतात. त्यांची फक्त एकच इच्छा आहे आणि ती म्हणजे त्यांची जमीन त्यांना परत मिळावी. त्यासाठीची सर्व कागदपत्रं त्यांनी आजही सांभाळून ठेवली आहेत.