अमेरिकेच्या लुसियानामध्ये एका ५६ वर्षीय महिलेसोबत जे झालं ते एखाद्या भीतीदायक स्वप्नापेक्षा कमी नाहीये. किम डोनिकोला नावाच्या या महिलेचं एक दिवस जोरात डोकं दुखलं. त्यांनी पतीला फोन केला. त्यांना रूग्णालयातही नेण्यात आलं. डोकेदुखी थांबली. पण इतक्या वेळातच ही महिला तिच्या आयुष्यातील ३८ वर्षांतील सर्व गोष्टी विसरली. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, किम यांना ट्रांजिएंट ग्लोबल एमनेसिया हा आजार आहे.
घटना गेल्यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातील आहे. किम एका स्थानिक चर्चमध्ये बायबल वाचण्यासाठी गेली होती. यादरम्यान त्यांचं अचानक डोकं दुखू लागलं. त्यानंतर त्यांनी पतीला फोन केला. पती येईपर्यंत त्यांना डोळ्यांसमोर सर्व धुसर दिसू लागलं. चर्चच्या पार्किंगपर्यंत पोहोचल्यावर त्यांना चक्कर आली आणि त्या पडल्या. त्यांना लगेच जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पण जेव्हा किम यांना शुद्ध आली तेव्हा त्या सगळंकाही विसरलेल्या होत्या.
किम या शुद्धीवर आल्यावर त्यांना नर्सने विचारलं की, तुम्हाला माहीत आहे का आज दिवस काय आहे आणि तुम्ही कुठे आहात? यावर किम यांनी उत्तर दिलं की, 'हो, हे १९८० साल आहे'. जेव्हा किम यांना विचारण्यात आलं की, देशाचे राष्ट्रपती कोण आहेत? यावर त्या म्हणाल्या की, रोनाल्ड रेगन.
किम यांनी सांगितलं की, त्यांना विचित्र तेव्हा वाटलं जेव्हा रूग्णालयात एक व्यक्ती त्यांच्याकडे आला आणि त्याने त्यांचा हात हातात घेऊन रडायला सुरूवात केली. किम या त्या व्यक्तीला ओळखू शकल्या नाहीत. ही व्यक्ती म्हणजे त्यांचे पती डेविड. डेविड आणि किम यांनी १७ वर्षांपूर्वी लग्न केलं होतं. आता किम यांना केवळ तेव्हाचं आठवत होतं. त्यावेळी त्या १८ वर्षांच्या होत्या. त्यानंतर संपूर्ण आयुष्य त्या विसरल्या.
किम सांगतात की, 'हे सगळं हादरवून सोडणारं होतं. मला सांगितले गेलं की, माझं लग्न झालं आहे. मला दोन मुलं आहेत. या दोन मुलांपासून मला तीन नातवंड आहेत. मला याबाबत दूरदूरपर्यंत काहीच माहीत नव्हतं. हे सगळं मला वेड लावण्यासारखं होतं'.
डॉक्टर्सही या गोष्टी हैराण झाले आहेत की, किम यांच्यासोबत असं कसं झालं. कारण त्यांना कोणतीही जखम नाही. ना त्यांना वेड लागल्यासारख त्या काही करत होत्या. सर्वप्रकारच्या टेस्ट केल्या होत्या. औषधेही सुरू होती. सामान्यपणे अशाप्रकारे स्मरणशक्ती जाणे हे क्षणिक असतं. पण किम यांच्याबाबत तसं झालं नाही. आता परिवारातील लोक त्यांना फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून आठवण करून देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
किम सुद्धा हळूहळू सगळंकाही आठवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना जगात झालेल्या बदलांची अधिक अडचण होत आहे. त्यांना स्मार्टफोन, कॉम्प्युटर, फ्लॅट टीव्ही स्क्रीन याबाबत काहीच माहिती नाही. त्यांना त्यांच्या भावाच्या आणि वडिलांच्या निधनाबाबतही काही आठवत नाही. चांगली बाब ही आहे की, किम या सकारात्मक विचाराच्या आहेत. त्या म्हणतात की, 'जर माझी स्मरणशक्ती परत आली नाही तर काही हरकत नाही. मी नवीन आठवणी तयार करेन'.