भुवनेश्वर - पु. ल. देशपांडे यांच्या अंतू बर्वा या व्यक्तिचित्रामध्ये सातत्याने निवडणुका लढून पराभूत होणाऱ्या अण्णू गोगटेविषयी तुम्ही वाचलंच असेल. पण प्रत्यक्षातही अशी एक व्यक्ती आहे जी गेल्या 62 वर्षांत एकूण 28 निवडणुका लढली असून, या सर्व निवडुकांमध्ये पराभूत झालीय. त्या व्यक्तीचे नाव आहे श्यामूबाबू सुबुधी. ओदिशा येथील श्यामबाबू सुबुधी या 84 वर्षीय गृहस्थांना निवडणुका लढवण्याचा छंद आहे. सलग 28 निवडणुकांमध्ये पराभूत झाल्यानंतर आता त्यांनी यावर्षी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. 1957 पासून निवडणुका लढवत असलेले श्यामबाबू सुबुधी यांनी आतातपर्यंत 10 विधानसभा निवडणुका लढवल्या आहेत. तसेच आतापर्यंत नऊ लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावले आहे. श्यामबाबू यांनी 1957 साली तत्कालीन मंत्री वृंदावन नायक यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्याबाबत श्यामबाबू म्हणतात की, मी मंत्री नायक यांच्याविरोधात हिंजली मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी माझा पराभव झाला होता. त्यावेळी मी केवळ 22 वर्षांचा होतो. दरम्यान 1962 पासून मी नियमितपणे निवडणुका लढवण्यास सुरुवात केली. तेव्हापासून निवडणुका लढवणे हाच माझ्यासाठी एकमेव ध्यास बनला आहे. निवडणुकीत जय-पराजय होणे मला महत्त्वाचे वाटत नाही. एखादे दिवशी जनता मला निवडून देईल, असी अपेक्षा आहे.'' आयुर्वेदिक डॉक्टरचा व्यवसाय करणारे श्यामबाबू सुबुधी हे आपल्याकडील बहुतांश कमाई ही निवडणुकांवरच खर्च करतात. श्यामबाबू हे यंदा गंजम जिल्ह्यातील अस्का आणि बरहामपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, त्यांनी पत्रके वाटून पुढील निवडणुकीसाठीच्या आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे.
62 वर्षांत 28 निवडणुकांमध्ये झाला पराभव, तरीही करताहेत 29व्यांदा लढण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2019 3:20 PM