(Image Credit : Whatshot)
जगात असे फार कमी लोक आहेत जे निसर्गाला टिकवून ठेवण्यासाठी झाड लावण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशाच एका महिलेबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या महिलेने त्यांच्या पतीच्या आठवणीत आतापर्यंत ७३००० झाडे लावली आहेत. जेनेट यज्ञेश्वरन असं या ६८ वर्षीय महिलेचं नाव असून त्या बंगळुरू येथील राहणाऱ्या आहेत. त्यांनी अनेक खाजगी आणि सरकारी संस्थांमध्ये काम केलं आहे.
जेनेट यांनी २००६ पासून आतार्यंत ७३ हजार झाडे लावली आहेत आणि येणाऱ्या वर्षांमध्ये त्या आणखी झाडे लावणार आहेत. त्यांनी त्यांच्या पतीच्या आठवणीत लावलेलं पहिलं झाड आता चांगलंच मोठं झालं आहे. जागतिक पर्यावरण दिवसाला त्यांनी ७३ हजार झाडांचा टप्पा पार केला.
बंगळुरू रिपोर्टनुसार, जेनेट बंगळुरू आणि कर्नाटकच्या अनेक भागात झाडे लावलीत. जेनेट यांचं लक्ष्य आहे की, यावर्षाच्या शेवटपर्यंत त्यांना ७५ हजार झाडे लावायची आहेत. जेनेट यांनी एका वृत्तपत्राला माहिती दिली की, त्यांनी लावलेलं झाडं मोठं होताना बघताना त्यांना फार गर्व वाटतो. जेनेट यांच्या पतीचं २००५ मध्ये निधन झालं होतं, ज्यानंतर त्यांनी झाडे लावण्याच्या अभियानाला सुरूवात केली. यावेळी बंगळुरूच्या अनेक भागांमध्ये झाडांची कत्तल सुरू होती. त्यानंतर त्यांच्या मित्रांनी त्यांना झाडे लावण्याचं अभियान सुरू करण्याचा सल्ला दिला होता.
त्या पुढे सांगतात की, 'मला असं वाटलं की, मी काहीतरी वेगळं करू शकते. त्यामुळे मी पतीच्या आठवणीत रोजानेट यज्ञेश्वरन चॅरिटेबल ट्रस्टची सुरूवात केली आणि आजूबाजूला झाडे लावणे सुरू केले'. जेनेट यांनी सुरूवातील आजूबाजूच्या लोकांनाही या अभियानात सहभागी होण्यासाठी विचारणा केली होती, पण काहीच लोक यात सहभागी झाले. त्यामुळे त्यांना एकटीने या अभियानाला पुढे नेलं आणि काही वर्षातच त्यांनी कर्नाटकसह तामिळनाडूमध्येही झाडे लावणे सुरू केले.