स्पेन - शयनगृहाच्या भिंतीजवळ कलकलाट करणाऱ्या तब्बल ८० हजार मधमाश्यांमुळे स्पेनमधील एका जोडप्याची झोप उडाली. मधमाश्यांच्या उपद्रवी आवाजामुळे अनेक रात्री जोडप्याला जागून काढाव्या लागल्या. अखेर मधुमक्षिका पालकाला त्यांनी पाचारण केले.आंदालुसिया स्वायत्त प्रदेशातील ग्रानादा या प्रमुख शहरात हे जोडपे वास्तव्यास आहे. ते झोपत असतानाच त्याच भिंतीजवळ आवाजाचा उपद्रव सुरू झाला. सुरुवातीला शेजाऱ्यांच्या घरातील वॉशिंग मशिन किंवा एअर कंडिशनरचा आवाज असेल वाटत होते. मात्र, हळूहळू आवाज वाढतच गेल्याने त्यांची घबराट झाली. सतत दोन वर्षे हा आवाज भिंतीमागून येत असे. परिसरातील उष्णतामान वाढल्याने हा आवाज असह्य झाला. अखेर उपद्रव थांबविण्यासाठी त्यांनी स्थानिक परिसरातील मधुमाशी पालनकर्त्याला मदतीसाठी येण्याची विनंती केली. तीन महिन्यांंपूर्वी असह्य आवाज सुरू झाला. काय करावे त्यांना समजत नव्हते, असे मधुमक्षिका स्थलांतरण विषयातील तज्ज्ञ सर्जिओ गुएरेरो यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. या जोडप्याने दीर्घकाळ मधमाश्यांची भुणभुण कशी सहन केली, याचे आश्चर्य या अनुभवी मधुमक्षिका पालकाला वाटत आहे. या वर्षी मधमाश्यांच्या पोळ्यांबद्दल सर्वाधिक तक्रारी आल्याचेही त्याने नमूद केले.मधमाश्यांचे पोळे मोठे असूनही त्यांच्या सतत गुंजनाचा आवाज जोडप्याला कसा आला नाही? सलग दोन वर्षे ते मधमाश्यांच्या सोबतीने कसे राहू शकले, याचे नवलच आहे, असे त्याने म्हटले आहे.
गुएरेरो म्हणाला की, मधमाश्यांच्या हालचालींप्रमाणे त्यांचा आवाज कमी-अधिक असतो. पोळ्यामध्ये शिरताना आणि बाहेर पडताना किंवा पोळ्यामध्ये काम करताना त्यांची भुणभुण वाढते. त्या परिसरात असंख्य फुलझाडे असल्याने आणि तापमान वाढल्याने मधमाश्यांचे पोळे खूपच मोठे वाढले.