प्रेमात पडलेल्या लोकांना ना जात, ना धर्म, ना वय, ना पैसा काहीच दिसत नसतं असं म्हणतात. अशा अनेक प्रेम कहाण्या नेहमीच समोर येत असतात. ज्या बघून हैराण व्हायला होतं. अशीच एक प्रेम कहाणी सध्या चीनमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
ऑडिटी सेंट्रल नावाच्या वेबसाईटनुसार, चीनच्या एका वृद्धाश्रमात काम करणारी तरूणी तिथेच राहणाऱ्या एका ८० वर्षीय वृद्धाच्या प्रेमात पडली. इतकंच नाही तर तिने घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्नही केलं. त्यांचे काही फोटोही व्हायरल झाले आहेत. ज्यात दोघेही रोमॅंटिक पोज देताना दिसत आहेत.
वृद्धाश्रमात भेट आणि मग लग्न
रिपोर्टनुसार, वृद्धाश्रमात काम करणाऱ्या तरूणीचं वय २३ आहे. तिची इथेच राहणाऱ्या एका ८० वर्षीय वृद्धासोबत भेट झाली. दोघांची मैत्री झाली त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे त्यांनी लग्न करण्याचं ठरवलं. तरूणीला या व्यक्तीची बुद्धीमत्ता आणि त्याचं परिपक्व वागणं आवडलं. तर व्यक्तीला तरूणीतील दयाळुपणा आवडला.
घरच्यांचा विरोध तरी केलं लग्न
आपल्या आजोबांच्या वयाच्या व्यक्तीसोबत लग्न करण्यासाठी तरूणीच्या परिवाराचा विरोध होता. पण तरूणीने त्यांच्या विरोधाला धुडकावलं आणि वृद्ध व्यक्तीसोबत लग्न केलं. त्यांचं लग्नही मोठं झालं. पण तिचा परिवार लग्नात नव्हता.
दोघांचीही नावं जाहीर करण्यात आली नाहीत. पण दोघांची चर्चा चीनच्या सोशल मीडियावर रंगली आहे. लोक त्यांच्या वयाच्या अंतरावर भाष्य करत आहेत. तर काही लोकांनी दोघांना सपोर्ट केलं तर काहींनी टिका केली.