प्रेमाला वय नसतं असं म्हणतात. पण जेव्हा एखादा तरूण व्यक्ती एखाद्या वयोवृद्ध महिलेच्या प्रेमात पडतो तेव्हा प्रकरण चर्चेचा विषय ठरतं. असं एकच प्रकरण ब्रिटनमधून समोर आलं आहे. ८१ वर्षीय आयरिस जोन्स ही महिला इजिप्तच्या एका ३५ वर्षीय तरूणाच्या प्रेमात पडली आणि इतकेच नाही तर दोघांनी लग्नही केलं. पण तरीही दोघांना एकत्र नाही तर एकमेकांपासून दूर रहावं लागत आहे. जोन्सने स्वत: एका शोमध्ये आपल्या या नात्याबाबत सांगितले.
फेेसबुकवर झाली होती भेट
जोन्स ही ब्रिटनच्या वेस्टनमध्ये राहणारी आहे. तिच्यापेक्षा ४६ वर्षाने लहान मोहम्मद अहमद इब्राहिमसोबत तिची भेट गेल्यावर्षी एका फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून झाली होती. आधी दोघे व्हर्चुअल भेटले. दोघात बोलणं झालं आणि जोन्स त्याला भेटण्यासाठी इजिप्तला गेली. दोघांनी काही वेळ सोबत घालवला आणि नोव्हेंबरमध्ये दोघांनी लग्न केलं. पण आता तिचा पती इजिप्तमध्ये आणि ती ब्रिटनमध्ये.
'मेट्रो'सोबत बोलताना जोन्स म्हणाली की, 'मला त्या व्यक्तीपासून वेगळं करण्यात आलं ज्याच्यावर माझं प्रेम आहे. मी उद्याही मरू शकते. वय आता साथ देत नाही. हे फार त्रासदायक आहे. पती सोबत नसणं हे फार वाईट आहे. मी तिनदा इजिप्तला गेले आणि त्याच्याशिवाय परतले'. पण ती इजिप्तला जाऊन राहू शकत नाही कारण तेथील वातावरण तिच्या आरोग्यासाठी चांगलं नाही.
रिपोर्टनुसार, जोन्सच्या पतीला ब्रिटनमध्ये येण्यासाठी व्हिसा मिळण्यात अडचण येत आहे. त्यामुळे जोन्स फार निराश आहे. तिला भीती आहे की, वाढत्या वयामुळे ती तिच्या पतीला भेटल्या शिवायच या जगातून जाणार तर नाही ना..तिने ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना अपील केली आहे की, तिच्या पतीला व्हिसा दिला जावा. कारण ते ब्रिटनच्या इकॉनॉमीसाठी एक अॅसेट होऊ शकतात.