नवी दिल्ली: मोटारसायकल किंवा चारचाकी वाहन चालवण्यासाठी परवान्याची(लायसन्स) गरज असले. जगात कुठलाच असा देश नाही, जिथे परवान्याशिवाय गाडी चालवता येते. गाडी चालवणाऱ्या प्रत्येकाला परवाना आवश्यक असतो. पण, यूकेमधील बुलवेल येथून एक मजेशीर प्रकरण समोर आले आहे. येथील एका 83 वर्षीय वृद्धाने दावा केला आहे की, तो मागील 70 वर्षापासून परवान्याशिवाय चारचाकी गाडी चालवत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी यूकेतील बुलवेल पोलिसांनी परवान्याशिवाय गाडी चालवणाऱ्या 83 वर्षीय वृद्धाला पकडले. पोलिसांसमोर त्याने मोठा दावा केला. त्याने सांगितले की, तो 13 वर्षांचा असल्यापासून म्हणजेच मागील 70 वर्षांपासून परवान्याशिवाय वाहन चालवत आहे. त्याने आतापर्यंत कधीच परवाना किंवा विमाही घेतलेला नाही. मागील 70 वर्षांपासून तो गाडी चालवत असून, यापूर्वी कधीच तो पकडला गेला नाही.
70 वर्षांपासून कोणाच्याच हाती आला नाही
त्या व्यक्तीने पोलिसांना असेही सांगितले की, मागील 70 वर्षात सुदैवाने त्याचा कधीही अपघात झाला नाही, किंवा त्यानेही कुणालाच इजा पोहचवली नाही. याचा अर्थ तो अतिशय सावधपणे गाडी चालवत होता. लहानपणी तो स्वत: गाडी चालवायला शिकला आहे आणि 70 वर्षांहून अधिक काळापासून गाडी चालवत आहे. तो यापूर्वी कधीच पकडला गेला नाही, ही अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे.
वृद्धावर कोणती कारवाई?ब्रिटीश वृत्तपत्र 'द सन'ने या प्रकरणातील माहिती देताना सांगितले की, या व्यक्तीचा जन्म 1938 मध्ये झाला होता आणि तो 1950 पासून कोणत्याही परवान्याशिवाय वाहन चालवत आहेत. मात्र, या प्रकरणी पोलिसांनी पुढे त्याच्यावर काय कारवाई केली हे अद्याप कळू शकले नाही. तसेच पोलिसांनी या वृद्धाचे नावही उघड केलेले नाही.