लहान मुलांच्या धाडसाच्या आणि शौर्याच्या अनेक घटना जगभरातून नेहमीच समोर येत असतात. या घटना आश्चर्यात पाडणाऱ्या कौतुक करावं वाटणाऱ्या असतात. नुकतीच अमेरिकेच्या मॅरिएटामधून अशीच एक घटना समोर आली आहे. इथे वादळात अडकलेल्या एका परिवारासोबत असंच काही घडलं.
इथे वादळात अडकल्यानंतर वेन आणि लिंडी बेकर यांची कार हवेत उडाली होती आणि नंतर एका पडलेल्या झाडाला जाऊन भिडली. दोघेही कारमध्ये अडकून पडले होते. तर त्यांचा 9 वर्षाचा मुलगा ब्रेनसन कसातरी कारमधून बाहेर आला होता. घाबरलेला असूनही भर वादळात तो दीड किलोमीटर मदतीसाठी धावत राहिला.
ब्रेनसनचे वडील वेनने सांगितलं की, आमचा जीव जाऊ शकला असता, पण ब्रेनसनने मदत आणून हिरोसारखं काम केलं. आम्हाला जवळपास 1 मैलापर्यंत वादळ दिसत होतं. पण ब्रेनसन न घाबरता धावत गेला. वेन सध्या बरा होत आहे आणि त्याची पत्नी लिंडी अजूनही हॉस्पिटलमध्ये आहे.
ब्रेनसनने एबीसी न्यूजला सांगितलं की, 'मी फार घाबरलेलो होतो. मी जसा मदतीसाठी जात होतो तेव्हा मी त्यांना म्हणालो की, फक्त मरू नका...मी लगेच येतो.
इन्स्टाग्राम पेज गुडन्यूज मुव्हमेंटवर ही स्टोरी शेअर करण्यात आली आहे. आतापर्यंत ही स्टोरी 77 हजारांपेक्षा जास्त वेळा बघण्यात आली आहे. पोस्टवर लोकांना शेकडो कमेंट्स आल्या आहेत. लोक ब्रेनसनचं भरभरून कौतुक करत आहेत.
एका यूजरने लिहिलं की, कारचा अपघात झाल्यावर आणि आई-वडिलांनी जखमी होताना बघत तो वादळात दीड किलोमीटर धावत गेले तो केवळ 9 वर्षाचा आहे. किती बहादूर मुलगा आहे. दुसऱ्याने लिहिलं की, खरंच कमालीचा मुलगा आहे. वाचून बरं वाटलं की, तुम्ही लोक बरे आहात.