तुम्ही अनेक मुलांच्या खोड्या पाहिल्या असतील, पण आज आम्ही तुम्हाला अशाच एका मुलाच्या खोड्याबद्दल सांगणार आहोत. ज्याच्या खोडसाळपणाने त्याच्या आई-वडिलांनाच नाही तर संपूर्ण देशालाच मोठा धक्का बसला. हा मुलगा घरापासून लांब एका फ्लाइटमध्ये लपून थेट २ हजार किमी दूर गेला. हे ऐकून तुम्हीही हैराण झाला असाल ना? कारण विमानतळ अधिकारी, सुरक्षा तपासणी आणि फ्लाइट अटेंडंट या सर्वांना चुकवत तो विमानात कसा गेला असेल.
९ वर्षांच्या मुलाने विमानातून केला लपून प्रवास
'द मिरर'च्या रिपोर्टनुसार, ब्राझीलच्या उत्तर-पश्चिम भागात राहणारा एक ९ वर्षांचा मुलगा फ्लाइटमध्ये लपून आपल्या घरापासून २ हजार किमी दूर पोहोचला. मुलाच्या आईने त्याचा शोध सुरू केला असता हा प्रकार उघडकीस आला. या सर्वात खोडकर मुलाचे नाव आहे इमॅन्युएल मार्क्स डी ऑलिवेरा.(Emanuel Marques de Oliveira) रिपोर्टनुसार, हा मुलगा पश्चिम ब्राझीलमधून विना तिकिट विमानाने देशाच्या दुसऱ्या टोकाला पोहोचला. याचे भान कोणालाच नव्हते. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे विमानतळाचे अधिकारी आणि सुरक्षारक्षकांनाही या मुलाने चकमा दिला. २६ फेब्रुवारीला सकाळपासून मुलगा त्याच्या घरात दिसला नाही. पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास आईने मुलाला झोपलेले पाहिले होते.
बेडवर झोपलेला मुलगा अचानक गायब
आईने सांगितले की, २ तासांनंतर जेव्हा ती मुलाच्या खोलीत गेली तेव्हा तो तिथे नव्हता. यानंतर ती घाबरली आणि सर्वत्र मुलाला शोधू लागली. संपूर्ण दिवस मुलाच्या शोधात गेला, परंतु त्याचा काहीही पत्ता लागला नाही. आईला कल्पना नव्हती की त्यांचा मुलगा २ हजार किमी दूर असलेल्या गौरुल्हौस येथे पोहोचला आहे. मुलगा विना तिकीट फ्लाइटमध्ये चढला आणि इतक्या दूर निघून गेल्याचं आईनं सांगितले. मुलाने घरातून निघण्यापूर्वी गुगलवर सर्च केल्याचं सांगितलं जात आहे. हा मुलगा कोणत्याही ओळखपत्र, कागदपत्रांशिवाय विमानात कसा बसला? याबाबत सध्या विमानतळाचे अधिकारी तपास करत आहेत. मुलाच्या या कारनाम्यामुळे पालकांसोबत देशालाही हैराण केले आहे.