ऑनलाइन लोकमत
मुंबई, 17 - मोठमोठ्या हॉटेलमध्ये वेटर, हाऊस किपर यांना टीप देणं प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जातं. हॉटेलात टीप देण्यामध्ये भारतीय प्रवाशांनी बाजी मारली असून, तब्बल 96 टक्के भारतीय प्रवासी हॉटेलमध्ये गेल्यावर टीप देत असल्याचे एका सर्वेमधून समोर आले आहे.
ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी एक्सपेडियाने '2016हॉटेल इक्विटी रिपोर्ट' मध्ये प्रसिद्ध केलेल्या सर्वेमधून ही माहिती मिळाली आहे. यापैकी 79 टक्के प्रवासी हे उत्तम रूम सर्विससाठी टीप देतात, तर 51 टक्के भारतीय प्रवासी हे चांगल्या हाऊस किपिंगसाठी टीप देतात. जवळपास 39 टक्के भारतीय प्रवासी हॉटेलमधील हमालाना टिप देतात, तर 24 टक्के प्रवासी हॉटलमधील खाजगी नोकराला टीप देतात.
या सर्वेमधून भारतीय प्रवशांचे वर्तन आणि प्राधान्यक्रम यांचीही चाचपणी करण्यात आली. हॉटेलमध्ये बुकिंग करताना 96 टक्के प्रवासी हॉटेलचे ठिकाण आणि किंमत यांचा गांभीर्याने विचार करताता. या पैकी 89 टक्के भारतीय प्रवासी हॉटेल बुक करताना हॉटेलच्या दर्जाबाबत प्रवाशांनी केलेले गुणांकनही विचारात घेतात. 35 टक्के भारतीय संगणक किंवा लॅपटॉपवरून हॉटेल बुक करतात, तर 14 टक्के भारतीय प्रवासी मोबाइल वेबचा वापर बुकिंगसाठी करतात. तसेच भारतीय प्रवाशांपैकी 50 टक्के प्रवासी हे मोठ्याने आवाज करणारे असतात, असेही समोर आले आहे.