लग्न म्हटलं तर दोन कुटुंबाच्या आनंदाचा क्षण, मात्र एका लग्न सोहळ्यात घडलेल्या भलत्याच प्रकारानं सगळेच हैराण झाले आहेत. लग्नाच्या दिवशीच नवरीनं मुलाला जन्म दिला. त्यामुळे लग्न रद्द करून वऱ्हाडी मंडळी माघारी फिरली. मात्र या प्रकारामुळे दोन्हीकडील कुटुंबांना मोठं नुकसान सहन करावं लागले आहे. लग्नाआधीच नवरी गरोदर होती परंतु डिलिवरी डेट १ महिन्यानंतर होती. परंतु वेळी आधीच डिलिवरी झाल्यानं हा प्रकार समोर आला.
स्कॉटलँडमधील स्टर्लिंगशायर येथील हा प्रकार आहे. गार्टमोर व्हिलेज हॉलमध्ये २०० पाहुण्यांच्या उपस्थितीत रेबेका मॅकमिलन आणि नीक चीथम या दोघांचा विवाह सोहळा पार पडणार होता. परंतु लग्नाच्या काही तास आधीच रेबेकाला प्रसुती वेदना सुरू झाल्या. ३२ वर्षीय रेबेका म्हणाली की, सर्व मुलींना वाटतं त्यांच्या लग्नाचा दिवस त्यांच्यासाठी स्पेशल असावा. मुलाच्या जन्मामुळे हा दिवस खूप स्पेशल बनला आहे. आम्ही दोघं लग्न करू शकलो नाही परंतु आम्हाला खूप सुंदर मुलगा जन्मला असं तिने सांगितले.
रेबेकाने ३६ वर्षीय नीक चीथमसोबत जुलै २०२१ मध्ये साखरपुडा केला होता. ५ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाच्या बंधनांत अडकण्याचा निर्णय घेतला. २१ मे रोजी दोघांचे लग्न होते. त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली होती. जेव्हा रेबेकाला कळालं ती गर्भवती आहे आणि २० जूनला बाळ जन्मण्याची शक्यता आहे. तेव्हा दोघांनी लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतला. रेबेका यांनी सांगितले की, आम्ही लग्नाची तारीख पुढे ढकलणार होतो परंतु कोरोना महामारीनं आम्हाला हे जीवन खूप छोटं आहे आणि आयुष्याचा काही भरवसा नाही अशी जाणीव झाली. त्यामुळे लग्न करण्याचा निर्णय घेतला.
रेबेकानं सांगितले की, बाळाचा जन्म वेळेपूर्वीच होईल असं मला वाटत होतं. लग्नाच्या एकदिवस आधीपर्यंत सगळं काही ठीक होते. आम्ही दिवसभर हॉलची तयारी केली. संध्याकाळी मला कसंतरी होऊ लागलं. डॉक्टरांनी तपासलं त्यानंतर मला ठीक वाटू लागलं. आम्ही प्री वेडिंग डीनर केले आणि सर्वजण विश्रांतीसाठी निघून गेले. त्यानंतर सकाळी मी उठल्यानंतर मला प्रसुती वेदना सुरू झाल्या. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तोपर्यंत कुटुंबाने सर्व पाहुण्यांना आणि हॉल कंत्राटदारांना लग्न रद्द झाल्याची बातमी दिली. रेबेकाने एका मुलाला जन्म दिला. त्याचे नाव रोरी इयान विलियम चीथम ठेवण्यात आले आहे. लग्नाच्या काही तास आधी सोहळा रद्द करावा लागल्याने जोडप्याला १२ लाख रुपये नुकसान झाले. परंतु बाळाच्या जन्मामुळे बहुमुल्य आनंद मिळाला असल्याचं रेबेकाने सांगितले.