Huia Bird feather : जगात हजारो प्रजाती पक्षी आढळतात. वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे दुर्मिळ पक्षी आढळतात. बरेच लोक पक्षी घरात पाळतात सुद्धा. वेगवेगळ्या सुंदर रंगांचे वेगवेगळ्या आकाराचे हे पक्षी असतात. तुम्ही पाहिलं असेल की, आपल्याकडे लोक मोराचं पंख घरात, पुस्तकात ठेवतात. साधारणपणे हे पंख बाजारात १०, २० रूपयांना मिळत असेल. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा पक्ष्याबाबत सांगणार आहोत ज्याचं एक पंख लाखो रूपयांना विकलं गेलं. आज आपण हेच जाणून घेणार आहोत की, हा पक्षी कोणता आहे आणि का त्याच्या एक पंखाला इतकी किंमत मिळाली.
लाखो रूपयांचं एक पंख
पक्ष्यांचे रंगीबेरंगी पंख नेहमीच लोकांसाठी आकर्षणाचं कारण ठरतात. बरेच लोक असे सापडलेले पक्ष्यांचे पंख आपल्याजवळ जपून ठेवतात. पण आज ज्या पक्ष्याबाबत आम्ही तुम्हाला सांगत आहोत त्याचं एक पंख तब्बल २३ लाख ६६ हजार रूपयांना विकलं गेलं. इतकंच नाही तर हे पंख बघण्यासाठी लोक दुरदुरून येत होते. पण असं या पंखात काय होतं की, ते इतक्या महाग विकलं गेलं.
एका रिपोर्टनुसार, हे पंख न्यूझीलॅंडमधील हुइया पक्ष्याचं आहे. हे पक्षी खूप वर्षाआधी लुप्त झाले आहेत. एका माहितीनुसार, हुआया पक्ष्यांना माओरी लोक पवित्र मानत होते. हा वेटलबर्ड फॅमिलीतील एक छोटा पक्षी होता. या पक्ष्याचे पंख फार सुंदर असतात. त्याच्या कोपऱ्यावर पांढरा ठिपका असतो. हे पंख घरातील प्रमुख आणि परिवारातील लोक हेडपीसच्या रूपात घालत होते. राजांच्या मुकुटावरही हे पंख लावलं जात होतं. या पंखाला राजघराण्यांमध्ये खूप मौल्यवान मानलं जातं.
पंखाचा लिलाव
न्यूझीलॅंडमध्ये हुइया पक्ष्याचा पंखाचा लिलाव झाला होता. लिलाव करणाऱ्या संस्थेला या पंखाला तीन हजार डॉलर मिळण्याचा अंदाज होता. एका माहितीनुसार, लिलावात या पंखाला आधीच्या रिकॉर्डपेक्षा ४५० टक्के जास्त किंमत मिळाली आहे. हुइया पक्ष्याच्या या पंखाला लिलावात २८, ४१७ अमेरिकन डॉलर म्हणजे जवळपास २३ लाख ६६ हजार रूपये किंमत मिळाली. न्यूझीलॅंड संग्रहालयानुसार हुइया पक्षी शेवटचे १९०७ साला आढळले होते.