बार्शी रोड मेंगाणेनगर येथील एका कोंबडीने तीन इंचाचे अंडे दिले आहे. सामान्यतः एक कोंबडीचे अंडे दीड ते पावणे दोन इंचाचे असते. मात्र, या कोंबडीने तीन इंचाचे अंडे दिल्याने चर्चेचा विषय बनले आहे.
सोलापूर बार्शी रोडवर दशरथ दंदाडे यांचे घर आहे. ते त्यांच्या घरासमोर कोंबड्या पाळतात. त्यांच्याकडे असलेल्या एका कोंबडीने मंगळवारी सकाळी एक अंडे दिले. हे अंडे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. कारण, हे अंडे नेहमीसारखे नसून त्याचा आकार हा मोठा होता. दशरथ दंदाडे यांना देखील याचे अप्रूप वाटले. त्यांनी त्यांच्या घरातील सदस्यांनाही हे अंडे दाखवले. सर्वांनाच या गोष्टीचे आश्चर्य वाटले. दशरथ दंदाडे यांनी इतके मोठे अंडे असते का याची चौकशी पोल्ट्री फार्म येथे केली. त्यावेळी इतके मोठे अंडे त्यांच्या पाहण्यातही आले नसल्याचे पोल्ट्री फार्म चालकांनी सांगितले.
अंड्याचे काय करणार ?
सामान्य आकारापेक्षा हे अंडे मोठे असल्याने त्याला जपून ठेवायचा विचार होता. त्या दृष्टीने अंडे फ्रीजमध्ये ठेवले होते. आता त्या अंड्याला धक्का लागल्याने ते थोडे चिरले आहे. हे अंडे जास्त दिवस टिकणार नाही, असे दशरथ दाडे यांनी सांगितले. हे अंडे एकच आहे की दोन अंडी चिकटल्यामुळे हे अंडे मोठे दिसत आहे. याबाबत अजून तरी स्पष्टता आली नाही.
"कधी कधी एका अंड्यामध्ये दोन पिवळे बलक येतात. त्यामुळे अंडे हे सामान्य आकारापेक्षा मोठे दिसते. एकाच अंड्यात दोन बलक असले तरी त्यातील एक सुदृढ तर दुसरे अशक्त असते. या अंड्याला उबवले तर त्यातून एकच पिल्लू जन्म घेऊ शकते. किंवा दोन्हीही दगावू शकतात."- डॉ. तानाजी भोसले, पशुधन विकास अधिकारी