अनेकदा समुद्र किंवा मोठ्या तलावांमध्ये जहाज बुडाल्याच्या घटना घडतात. यातील काही जहाजांची माहिती मिळते, तर काही फक्त रहस्त बनून राहतात. कॅरिबियन समुद्रातील बर्म्युडा ट्रँगल अशाच काही ठिकाणांपैकी आहे, जिथे शेकडो जहाजे रहस्यमरीत्या गायब झाली आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा एका घटनेबद्दल सांगणार आहोत, जी समुद्रात नाही, तर एका तलावात घडली. 84 वर्षांपूर्वी उत्तर अमेरिकेतील लेक सुपीरियरमध्ये बुडालेल्या जहाजाचे अवशेष सापडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एसएस अर्लिंग्टन नावाचे जहाज 1940 मध्ये सुपीरियर तलावाच्या मध्यभागी वादळी हवामानात अडकून बुडाले. आता 84 वर्षांनंतर या जहाजाचे अवशेष सापडले आहेत. या जहाजाचे अवशेष सापडणे सामान्य गोष्ट नाही. कारण, यामुळे एका कुटुंबाला त्यांच्या काही प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात, ज्याची ते अनेक वर्षांपासून वाट पाहत होते.
जहाजावर घडली ही रहस्यमय घटना!हे जहाज बुडाले, तेव्हा त्याच्यासोबत एक विचित्र घटना घडली होती. जहाज बुडत असल्याचे पाहून जहाजातील सर्व कर्मचारी लाईफबोटीवर चढले, पण जहाजाचा कॅप्टन फ्रेडरिक बर्कने वेळ असूनही लाईफबोटीत चढण्यास नकार दिला. त्याने हसत हसत सर्वांना बाय केले अन् तेवढ्यात जहाज तलावात सामावून गेले. कॅप्टनने असे का केले, याचे उत्तर आजपर्यंत समजले नाही.
जहाज बुडण्याचे नेमके कारणही आतापर्यंत समोर आले नाही. पण, आता या जहाजाचे अवशेष सापडले आहेत, संशोधक याचे परीक्षण करतील आणि अपघाताचे कारण शोधतील. दरम्यान, मिशिगनमधील नेगौनी येथील रहिवासी असलेल्या फाउंटन नावाच्या माणसामुळे आर्लिंग्टन जहाजाचा शोध लागला आहे. फाउंटन जवळपास एक दशकापासून या जहाजाच्या दुर्घटनेच्या शोधात सुपीरियर लेकमध्ये रिमोट सेन्सिंग करत आहे.
आता लेक सुपीरियर बद्दल थोडे जाणून घ्या. सुपीरियर तलाव क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे तलाव आहे. आकारमानानुसार हे जगातील तिसरे मोठे सरोवर असून, जगातील 10% ताजे पाणी त्यात आहे. अनेक शतकांपासून या तलावाचा व्यावसायिक शिपिंग कॉरिडॉर म्हणून वापर केला जातो.