गेल्या ७ जुलै रोजी तायवानच्या न्यू तायपेच्या एका बेटाकडे जात असलेल्या मासेमारी करणाऱ्या एका बोटातील लोकांना दूर अंतरावर पाण्यावर काहीतरी वेगळं दिसलं. बोट त्या दिशेने नेली तर त्यांना एका ट्यूबवर एक व्यक्ती विना कपड्यांचा त्यावर दिसला. दूर समुद्रात असं कुणी सापडणं फारच अजब होतं. बोटीतील लोकांनी या व्यक्तीला वाचवलं.
ऑनलाईन व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये बोटवरील व्यक्ती अडकलेल्या व्यक्तीकडे लाइफबॉय फेकताना आणि नंतर त्याला पोर्टवर परत नेताना व नंतर इमरजन्सी सर्विसेसना कॉल करण्याआधी खेचताना बघता येतं. पाणी न मिळाल्याने थकलेल्या व्यक्तीचं वय ५८ आहे. नंतर असं समजलं की, ही व्यक्ती १९ तास समुद्रात अशीच अडकून होती.
हॉंग नान असं नाव असलेल्या या व्यक्तीने सांगितलं की, ६ जुलैच्या सायंकाळी ६ ते ७ वाजता तो कामावरून आला. थकवा जाणवत असल्याने तो थोडावेळ रिंग घेऊन समुद्रात गेला. इथे त्याने दारू प्यायली आणि रिंगवरच त्याचा डोळा लागला. काही तासांनी जेव्हा त्याला जाग आली तेव्हा तो समुद्राच्या मधोमध होता. त्याला दूरदूरपर्यंत कुणीच दिसत नव्हतं.
तो म्हणाला की, मी अनेक तास मदतीसाठी ओरडत राहिलो. पण काही फायदा झाला नाही. कारण अनेक मैल कुणीच नव्हतं. मी रात्रभर रिंगवर फिरत राहिलो. दुसऱ्या दिवशी दुपारी साधारण दीड वाजता एक बोट आली त्यातील लोकांना मी दिसलो आणि त्यांनी मला वाचवलं. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आता व्यक्तीला घरी सोडण्यात आलं आहे.