ग्वाल्हेर : येथील कमलराज रुग्णालयात एका महिलेने ४ पायांच्या मुलीला जन्म दिला आहे. ही माहिती समाजमाध्यमांवर पसरताच या मुलीला पाहण्यासाठी लोकांनी रुग्णालयात गर्दी केली. डॉक्टरांनी नवजात बालकाला नवजात शिशुकक्षात ठेवले आहे. या प्रकाराला डॉक्टर वैद्यकीय भाषेत ‘इशिओपॅगस’ असे म्हणतात. लाखांमधून एका मुलाला असे अतिरिक्त अंग तयार होते.
डॉक्टरांनी सांगितले की, बाळाचे वजन २.३ किलो आहे. मुलीची तब्येत उत्तम असून, डॉक्टर तिच्यावर लक्ष ठेवून आहेत. शस्त्रक्रियेद्वारे तिचे अतिरिक्त दोन पाय काढण्यात येतील.हे पहिलेच प्रकरणकमलराज हॉस्पिटलचे बालरोगतज्ज्ञ डॉ. आरडी दत्त यांनी सांगितले की, मुलीवर उपचार सुरू आहेत. या प्रकारात गर्भाचे शरीर अतिरिक्त विकसित होते. भारतात आतापर्यंत फक्त चारच मुले या आजाराने ग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. मध्य प्रदेशातील हे पहिलेच प्रकरण आहे. दोन शस्त्रक्रियेनंतर दोन्ही पाय काढता येतील. त्यानंतर बाळ सामान्य मुलांप्रमाणे चालू शकेल.