Motivational Story of Abhinav Sharma : मनात चिकाटी आणि प्रबळ इच्छाशक्ती असेल तर माणूस कठीण परिस्थितीतही यश मिळवू शकतो. याचे जिवंत उदाहरण म्हणजे नोएडा येथील अभिनव शर्मा. वर्षभर तो कोमात होता. यानंतरही त्याने हार मानली नाही. आजारातून सावरल्यानंतर त्याने पुन्हा अभ्यास सुरू केला. अभिनव बारावीची परीक्षा पास तर झालाच, पण त्यासोबत त्याने ९२ टक्के गुणही मिळवले. कोमातून बाहेर येणं, त्यानंतर पुन्हा अभ्यास सुरू करणं, सगळं समजून घेणं, हे सगळं लक्षात ठेवणं हे सारं त्याच्यासाठी सोपं नव्हतं. पण त्याने हार मानली नाही.
२०१८ साली हृदयविकाराचा 'झटका'
अभिनव शर्मा हा मूळचा नोएडा, उत्तर प्रदेशचा असून तो सोमरविले स्कूलमध्ये शिकतो. त्याच्या आईचे नाव अनुपमा मिश्रा असून त्या डॉक्टर आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनवच्या आईने सांगितले की, २०१८ मध्ये एक दिवस अभिनवला अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्याच्या मेंदूलाही दुखापत झाली आणि तो कोमात गेला. त्यावेळी अभिनव बारावीत शिकत होता.
अभिनव एक वर्ष कोमातच
हृदयविकाराचा 'झटका' आल्यानंतर वर्षभर अभिनव कोमात होता. कोमातून बाहेर आल्यानंतर तो हळूहळू सावरला. पण २०१९च्या काळातील अनेक गोष्टी तो विसरला होता. कोमात जाण्यापूर्वी तो अकरावी उत्तीर्ण होऊन बारावीत शिकत होता. पण त्या झटक्याने तो शिक्षणातलं बरंच काही विसरला होता. अभिनवसाठी पुन्हा अभ्यास करणं खूपच अवघड होते. तरीही, त्याने २०२० मध्ये पुन्हा अकरावी मध्ये प्रवेश घेतला.
सुरुवातीचा काळ होता कठीण
पहिले ६ महिने अभिनवला खूप समस्या होत्या. त्याला अभ्यास सहजासहजी समजत नव्हता. विषय नीट समजले नाहीत. आधार मिळेल असे जुने मित्रही नव्हते. पण अभिनवने हार मानली नाही. त्याने आपले प्रयत्न सुरूच ठेवले आणि तो अकरावीची परीक्षा उत्तीर्ण झाला. यानंतर बारावी बोर्डाची परीक्षा हे त्याच्यासमोर मोठे आव्हान होते. पण यासाठी अभिनवने खूप मेहनत घेतली आणि त्याचा परिणाम म्हणून त्याला बारावीत तब्बल ९२.४ टक्के गुण मिळाले.