लंडन, दि. 23- समोसा या खाद्यपदार्थाचं नाव ऐकलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. विशेष म्हणजे भारतीय व्यक्ती जेव्हा विदेशात असते तेव्हा खाद्यपदार्थांमध्ये खाण्याची कमी त्या व्यक्तीला जास्त जाणवते. जर तिथल्या कुठल्याही हॉटेलमध्ये समोसा दिसला तर लगेचच त्या समोश्यावर ताव मारला जातो. सध्या भारतापासून हजारो मैल दूर लंडनमध्ये तयार झालेला समोसा सगळ्यांच्या चर्चेचा विषय आहे. लंडनमधील बऱ्याच टीव्ही चॅनल आणि वृत्चपत्रात या समोश्याची चर्चा होते आहे. मंगळवारी लंडनमध्ये दुनियेतील सगळ्यात मोठा समोसा लोकांना पाहिला. त्या समोश्याचं वजन 153.1 किलो इतकं आहे. हा समोसा तयार करायला तब्बल 15 तास लागले होते. टीमच्या प्रयत्नानंतर 15 तासांनी हा समोसा तयार झाला. तसंच डझनभर स्वयंसेवकांनी हा भलामोठा समोसा तयार करण्यासाठी काम केलं आहे.
पूर्व लंडनमधील एका मशिदीमध्ये हा समोसा तयार करण्यात आला आहे. मुस्लीम समाजाच्या विकासासाठी काम करणाऱ्या एका संघटनेने हा समोसा तयार केला आहे. संघटनेतील स्वयंसेवकांकडून हा समोर तयार होत असताना तेथे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारीही उपस्थित होते. याआधी जून 2012 उत्तर इंग्लंडमधील ब्रॅडफोर्ड कॉलेजमध्ये 110.8 किलो वजनाचा समोसा बनविण्याच्या विक्रमाची नोंद आहे. एका भल्यामोठ्या वायर मेशवर हा समोसा तयार करण्यात आला आणि त्यानंतर त्याचं वजन करण्यात आलं होतं. समोसा तयार करताना सगळ्यांच्याच मनात भीती होती. समोसा तयार करत असताना तो तुटेल, असं प्रत्येकाला वाटत असल्याचं, प्रोजेक्ट मॅनेजर फरिद इस्लाम यांनी सांगितलं.
153 किलो वजनाचा समोसा तयार करत असताना सगळ्या नियमांचं पालन केलं गेलं. समोश्याची चव चाखल्यानंतर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या कर्मचाऱ्यांनी त्याला दुनियेतील सगळ्यात मोठा समोसा असल्याता किताब दिला, असं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे कर्मचारी प्रवीण पटेल यांनी सांगितलं.
लंडनच्या मशिदीमध्ये तयार केलेल्या या भल्यामोठ्या समोश्याचे लहान लहान तुकडे करून तेथिल स्थानिक बेघर लोकांना वाटले जाणार आहेत.