अफगाणिस्तानमध्येतालिबान्यांनी महिला आणि तरुणांच्या स्वातंत्र्यावर गदा आणलेली असतानाच अफगाणिस्तानमधील न्हावीही भीतीच्या सावटाखाली आहेत. विशेष म्हणजे याचं कारणं टायटॅनिक फिल्ममधील अभिनेता लियोनार्डो डिकॅप्रियो आहे. अफगाणिस्तानमधील न्हाव्यांच टायटॅनिक कनेक्शन नेमकं काय आहे जाणून घेऊया...
२००१ मध्ये जेव्हा अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांच शासन होतं तेव्हा तालिबान्यांनी अनेक न्हाव्यांना जेलमध्ये टाकलं होतं. कारणं त्यावेळी टायटॅनिक हा हॉलीवुड चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी लियोनार्डो डिकॅप्रियो याच्या चित्रपटातील कॅरेक्टरप्रमाणे हेअरस्टाईल केली होती. हा हेअरकट करणाऱ्या सलुनमधील न्हाव्यांना तालिबान्यांनी जेलमध्ये बंद केलं.
धार्मिक गोष्टींबाबत तालिबान्यांना काबुलमधील न्हाव्यांना नोटीस पाठवली होती की, जो कोणी परदेशी हेअरस्टाईल किंवा हेअरकट करून देईल त्याला त्याची शिक्षा भोगावी लागेल. अनेक तरुणांनी त्यावेळी प्रसिद्ध बँड बीटल्समधील कलाकारांप्रमाणे हेअरस्टाईल ठेवायला सुरुवात केली होती. तालिबानी त्या तरुणांना पकडून नेत व त्यांचे टक्कल करत.
आता २० वर्षांनंतर पुन्हा तालिबान्यांची सत्ता आली आहे. त्यामुळे आमचं भविष्य अधांतरी असल्याचं मोहम्मद अमीन नुरी नावाच्या अफगाणिस्तानमधील न्हाव्यानं रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. प्रत्येकजण घाबरलेला आहे. मीही घाबरलेलो आहे. असंही तो म्हणाला. आता अफगाणिस्तानमध्ये सर्वांना दाढी ठेवावी लागणार आहे.