आजच्या काळात पत्र पाठवणं ही काही सामान्य बाब राहिलेली नाही., मात्र काही दशकांपूर्वी पत्र हे संवादाचे महत्त्वाचे साधन होते. जगातील वेगवेगळ्या भागातून लोक एकमेकांना पत्रं पाठवायचे. कधी कधी ही पत्रं वेळेवर पोहोचायची. तर कधी उशीर व्हायचा. मात्र हा उशीर काही आठवड्यांचा असायचा. कधी कधी काही महिने लागायचे. मात्र एखादं पत्र पत्त्यावर पोहोचायला ८० वर्ष लागू शकतात का? हल्लीच अमेरिकेतील डिकाल्ब येथून अशीच घटना समोर आली आहे. १९४३ मध्ये इलिनोइसच्या एका जोडप्याला पाठवलेलं एक पत्र सुमारे ८० वर्षांनंतर एका पोस्ट ऑफिसमध्ये सापडलं. त्यानंतर हे पत्र त्या कुटुंबातील एका सदस्याकडे सुपूर्द करण्यात आलं. हे पत्र लुईस आणि लावेन जॉर्ज यांच्यासाठी पाठवण्यात आलं होतं. जेव्हा हे पत्र अचानक पोस्ट ऑफिसमध्ये सापडलं, तेव्हा एका कर्मचाऱ्याने जॉर्ज कुटुंबाला शोधण्याचा प्रयत्न केला. अखेरीस त्यांनी हे पत्र पोर्टलँड, ओरेगॉन येथे राहणाऱ्या जॉर्ज कुटुंबातील एक नातेवाईक ग्रेस सालाजार यांना दिले.
त्यांनी हे पत्र लुईस आणि लावेना जॉर्ज यांची मुलगी जेनेट जॉर्ज हिच्यापर्यंत पोहोचवले. पत्र मिळाल्यानंतर जेनेट जॉर्जने डब्ल्यूआयएफआर टीव्हीशी बोलताना सांगितले की, अचानक एक जुनं पत्र आमच्यासमोर आलं. ही बाब अविश्वसनीय आहे. हे पत्र पाहून प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का बसला होता. हे पत्र अचानक कुठून आलं, याचाच विचार आम्ही करत होतो.
हे पत्र उघडल्यावर आम्हाला समजले की, १९४३ मध्ये पाठवलेलं हे पत्र जेनेट हिच्या आई-वडिलांना त्यांच्या चुलत भावाने लिहिलं होतं. त्या पत्रामधून जेनेट यांच्या आई-वडिलांची पहिली मुलगी एलविन हिच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त करण्यात आलं होतं. जेनेट म्हणाल्या की, माझ्या आधी माझ्या आई वडिलांनी एक बाळ गमावलंय, हे मला अजूनपर्यंत माहिती नव्हतं. मी त्याबाबत भावूक झाले होते. एका बाळाला गमावणं नेहमीच दु:खदायक असतं. या पत्रामुळे माझ्या जन्मापूर्वी माझ्या आई-वडिलांवर उद्भवलेल्या दु:खद प्रसंगाची मला जाणीव झाली.
जॉर्जच्या कुटुंबीयांचा शोध घेणाऱ्या पोस्टातील कर्मचाऱ्याने सांगितले की, या पत्रावर केवळ रस्त्याचं नाव होतं. मात्र घराचा क्रमांक नव्हता. त्यामुळे हे पत्र एवढी वर्षे पोस्टात पडून होतं.