प्रेमात जर कुणाला दगा मिळाला तर ती व्यक्ती पूर्णपणे बिथरते. ब्रेकअपमधून बाहेर पडणं कुणासाठीही सोपं नसतं. लोक बरीच वर्ष स्वत:ला सांभाळू शकत नाहीत. ज्या नात्यावर आपण खूप विश्वास ठेवतो ते तुटलं तर त्याचा मनावर खोलवर परिणाम होतो. पण यातून बाहेर कसं पडायचं हे पूर्णपणे त्या व्यक्तीवर अवलंबून असतं. असंच काहीसं देहरादूनच्या एका व्यक्तीसोबत झाल. त्याने ब्रेकअपला त्याच्या जीवनाचा नवा मार्ग बनवलं आहे.
दिव्यांशु बत्रा असं या २१ वर्षीय तरूणाचं नाव आहे. इतक्या कमी वयात प्रेयसीने दगा दिल्याने तो बिथरला होता. पण प्रेमात मिळालेल्या या अपयशातून स्वत:ला नुकसान करून घेण्याऐवजी त्याने जीवनाचा नवा मार्ग शोधला. दिव्यांशुने देहरादूनच्या जीएमएस रोडवर 'दिल टूटा आशिक - चाय वाला' नावाने एक रेस्टॉरन्ट सुरू केलं. या नावावरूनच समजतं की, त्याला प्रेमात दगा मिळालाय.
आपली दु:खद प्रेम कहाणीबाबत तो म्हणाला की, 'माझी हायस्कूलच्या दिवसात एक गर्लफ्रेन्ड होती. तिने गेल्यावर्षी माझ्यासोबत ब्रेकअप केलं. तिचे आई-वडील या नात्या विरोधात होते. त्यानंतर मी जवळपास सहा महिने निराश होतो आणि पूर्ण वेळ PUBG खेळण्यात घालवत होतो'. एक दिवस त्याने निर्णय घेतला आणि यातून बाहेर पडायचं ठरवलं.
दिव्यांशुने आपल्या सेव्हिंग्समधून कॅफे सुरू केला. हा कॅफे तो त्याचा लहान भाऊ राहुलसोबत चालवतो. या कॅफेच्या माध्यमातून त्याला प्रेमात दगा मिळालेल्या लोकांची मदत करायची इच्छा आहे. तो म्हणाला की, 'जीवनात प्रत्येकजण यातून जात असतो. त्यामुळे मला वाटत होतं की, त्यांनी इथे यावं आणि त्यांचे किस्से, दु:खं शेअर करावं. जेणेकरून त्यांना या त्रासातून बाहेर येण्यासाठी मी मदत करू शकेन'.
त्याच्या या कॅफेने लोकांचं लक्ष आकर्षित केलं. कॅफेचं टायटलच असं आहे की, लोकलच काय तर टुरिस्ट लोकही इथे येतात आणि वेळ घालवतात. सोशल मीडियावरही या कॅफेची चर्चा रंगली आहे.