केंद्रपाडा : चलनातून बाद करण्यात आलेल्या जुन्या नोटा भलेही कोणासाठी रद्दी असतील. मात्र, केंद्रपाडा येथील एका वकिलासाठी या नोटा म्हणजे अमूल्य खजिना आहेत. पेशाने वकील असलेल्या मोहंमद मुश्ताक यांचे घर म्हणजे नोटांचे लघु संग्रहालयच झाले आहे. १९७८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी केलेल्या नोटाबंदीदरम्यान चलनातून बाद केलेली एक हजाराची नोट त्यांच्याकडे आहे. याशिवाय स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर चलनातून बाद झालेल्या नोटाही त्यांच्याकडे आहेत. त्यांना त्यांच्याकडील नोटा आणि नाण्यांच्या संग्रहाचा अभिमान आहे. वकिलीशिवाय प्राचीन वस्तू गोळा करणे हा माझ्या जीवनाचा भाग आहे. ८ नोव्हेंबरला नोटाबंदी झाल्यानंतर मी माझ्याकडील संग्रह पाहिला. तेव्हा मोरारजी देसाई यांनी बंद केलेली एक हजाराची नोट माझ्याकडे असल्याचे पाहून मला आनंद झाला. देसाई सरकारने १,००० रुपये, ५,००० रुपये आणि १०,००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. त्यापैकी १,००० रुपयाची नोट मी १९८३ मध्ये मिळवू शकलो, असे मुश्ताक म्हणाले. त्यांच्याकडे ७० देशांचे चलनही आहे. यात भारत-पाक, भारत-ब्रह्मदेश काळातील चलनी नोटांसह खादीची नोट आणि ब्रिटिश काळातील वादग्रस्त नाणेही आहे. हे नाणे पिग रुपये क्वॉईन या नावाने ओळखले जाते. त्यांच्या संग्रहात १ एप्रिल १९४८ रोजी भारत सरकार आणि आरबीआयकडून पाकिस्तानच्या सरकारच्या वतीने जारी करण्यात आलेल्या हंगामी नोटांचाही समावेश आहे. या नोटा पाकिस्तानात उपयोगासाठी छापण्यात आल्या होत्या. त्यांच्याकडे खादीच्या नोटाही आहेत. या नोटांद्वारे केवळ खादीचे कपडे खरेदी करता येऊ शकत होते.
चलनातून बाद नोटांचा संग्राहक
By admin | Published: February 24, 2017 1:32 AM