- नागेश माेहितेधाड : आयुष्यभर काळया मातीची सेवा करताना समर्थपणे साथ देणाऱ्या बैलाचे निधन झाल्यानंतर देवपूर येथील शेतकऱ्याने त्याची चक्क तेरवी केली़ आपल्या लाडक्या बैलाला निराेप देताना अवघ्या शेतकरी कुटुंबालाच अश्रु अनावर झाले हाेते़ या बैलावर असलेले प्रेम शेतकऱ्याने तेरवी करून व्यक्त केला़
धाड येथून जवळच असलेल्या देवपूर येथील सधन शेतकरी आणि माजी सरपंच संदीप विक्रम नरोटे यांच्याकडे गत २३ वर्षांपासून असलेल्या बैलाचा २८ जून राेजी मृत्यू झाला़ त्यामुळे, नरोटेंच्या कुटुंबावर दु:खाचा डाेंगर काेसळला़ विधीवत आपल्या लाडक्या जनावराचे पुजन करून नरोटे कुटुंबाने आपल्या सुखऱ्या नावाच्या बैलास अखेरचा निरोप दिला.तसेच १० जुलै रोजी संदीप नरोटे आणि कुटुंबाने त्यांच्या लाडक्या सुखऱ्या या बैलाच्या तेरवीचा कार्यक्रम विधीनुसार ग्रामस्थांना आणि नातलगांना आमंत्रित करुन विधिवत तर्पण करुन तेरवीचा कार्यक्रम उरकला. २३ वर्ष सेवा करून सुखऱ्या बैलाने वयाच्या २५ व्या वर्षी जगाचा निराेप घेतला़
२३ वर्षांपूर्वी आणले हाेते घरीसुखऱ्या या बैलाचे मालक संदीप नरोटे यांनी माहिती देताना सांगितले की साधारण २३ वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांनी अगदी लहान असलेल्या सुखऱ्याला बाजारातून खरेदी करून आणले होते. हळूहळू सुखऱ्या बैल घरच्या सर्वांना आवडता झाला, नंतर मोठा होत असताना सुखऱ्या बैल शेती कामाला, वेगवान धावण्यातआणि अनेक हुशारी करामतीने घरच्या मंडळींना कधीच घरातील एक अविभाज्य घटक बनला हे कळाले नाही.शंकर पटातही मिळविली बक्षीसे
नरोटे यांच्या सांगण्यानुसार अनेक शंकरपटात सुखऱ्या बैलाने बक्षिसे मिळवून मालकाची शान राखली आहे़ तर शेती मशागतीत तो सदैव समोर राहत असे़ एकवेळ संदीप नरोटे यांचा मुलगा बैलगाडी मधून गाडीच्या चाकामध्ये पडला़ मात्र ही बाब सुखऱ्या बैलाच्या तात्काळ लक्षात आली आणि तो जागेवर थांबला़ त्यामुळे मुलाचा जिव वाचल्याची घटना त्यांनी कथन केली़ यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते..