कराची : निवडणुकीमध्ये विजयी घोषित झाल्यानंतर आपण नाहीतर प्रतिस्पर्धी उमेदवार खरा विजेता असल्याचे सांगत एका नेत्याने आमदारकीवर पाणी सोडले.
पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने ८ फेब्रुवारी रोजी कराची मध्य ८ या विधानसभा मतदारसंघातून जमात ए इस्लामीचे हाफिज नईमूर रहमान यांना २६ हजार २९६ मतांनी विजयी घोषित केले. मात्र, नईमूर यांनी आपला नाहीतर पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्ष पुरस्कृत उमेदवार विजयी झाल्याचे सांगत आमदारकी स्वीकारण्यास नकार दिला. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, काही शे मतांचा फरक होता. त्यामुळे मी माझ्या प्रतिनिधींना तपासणी करण्यास सांगितले. तेव्हा आमच्यापेक्षा पीटीआय पुरस्कृत अपक्ष सैफ बारी यांना अधिक मते मिळाल्याचे आढळून आले. त्यामुळे मी सदसद्विवेकबुद्धी व नैतिक परंपरेला अनुसरून आमदारकी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
इम्रान खान विरोधी बाकांवर बसणार?इम्रान खान यांच्या पक्षाने विरोधी बाकांवर बसण्याचा निर्णय घेतल्यामुळे नवाज शरीफ आणि बिलावल भुत्तो-झरदारी यांचे आघाडी सरकार हा एकमेव पर्याय उरला आहे. त्यांच्यातील वाटाघाटीकडे देशाचे लक्ष लागले आहे. या वाटाघाटीत पंतप्रधानपद हा कळीचा मुद्दा राहणार आहे.