उत्तर प्रदेशातील आग्रा येथे रस्त्याच्या समस्येबाबत अनोखं आंदोलन करण्यात आलं. एका जोडप्याने नवरा-नवरीच्या पोशाख करून आंदोलन केलं आहे. नाल्याच्या खराब पाण्यात आणि चिखल असलेल्या रस्त्यावर उभे राहून त्यांनी एकमेकांना पुष्पहार घालून लग्नाचा वाढदिवस साजरा केला. या अनोख्या आंदोलनात कॉलनीतील रहिवासी पाहुणे म्हणून सहभागी झाले होते.
प्रत्येकाच्या हातात पोस्टर होते. पोस्टरवर मोठ्या अक्षरात नाला आणि रस्ता बांधला नाही तर मतदान करू नका असं लिहिलं होतं. नगला कली रजरई रोडवरील मारुती प्रवाशमच्या गेट क्रमांक तीनजवळ हे आंदोलन करण्यात आलं. जिथे 15 वर्षांपासून रस्त्याची समस्या कायम आहे.
हळूहळू आठ महिन्यांत येथील रस्त्याचे नाल्यात रूपांतर झाले आहे. आजूबाजूच्या वसाहतींमध्ये राहणाऱ्या लोकांना रस्त्यावरून जाणं कठीण झालं आहे. सेमरी, नौबरी, पुष्पांजली होम्स, पुष्पांजली इको सिटी यासह 30 हून अधिक वसाहतींमधील लोकांची ये-जा होत असते.
खराब रस्त्यांमुळे लोक आता 2 किलोमीटरचा वळसा घालून इतर मार्गाने जात आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी स्थानिक लोकांनी यापूर्वी अनेकदा लोकप्रतिनिधींकडे केली आहे. काही दिवसांपूर्वी कॉलनीबाहेर 'विकास नाही, मत नाही'चे पोस्टरही चिकटवण्यात आले होते. मात्र पोस्टर चिकटवूनही प्रश्न सुटू शकलेला नाही.
हताश झालेल्या पुष्पांजली होम्स कॉलनीतील रहिवासी भगवान शर्मा यांनी नाल्याच्या पाण्यात उभे राहून 17 वा लग्नाचा वाढदिवस साजरा केला. भगवान शर्मा म्हणाले की, आम्ही गेली 15 वर्षे सातत्याने प्रयत्न करत आहोत. सर्व लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांकडे गेले आहेत. कुठेही सुनावणी न झाल्याने आम्हाला असं आंदोलन करावं लागलं आहे.