उत्तर प्रदेशच्या आग्रामधून पती-पत्नीच्या घटस्फोटाची एक अजब घटना समोर आली आहे. त्यांच्या घटस्फोटाचं कारण ऐकून सगळेच हैराण झाले आहेत. असं सांगण्यात येत आहे की, पतीला आपल्या पत्नीची दातांवर मंजन घासण्याची सवय आवडत नव्हती. ज्यामुळे त्यांचं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं. पत्नीने दातांवर मिशरी घासू नये असं पतीला वाटत होतं. अनेकदा मनाई करूनही ती ऐकली नाही आणि मिशरीने दात घासत राहिली.
असं सांगण्यात आलं की, हे मंजन तंबाखूपासून तयार केलेलं होतं. पतीचा आरोप आहे की, त्याची पत्नी दिवसातून एक वेळ नाही तर दिवसातून तीन ते चार वेळा तंबाखूच्या मंजनाने म्हणजे मिशरीने दात घासत इकडे तिकडे फिरत होती. अनेकदा मनाई करूनही पत्नीने ऐकलं नाही. ज्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर पतीने पत्नीला घरातून बाहेर काढलं.
पत्नी गेल्या दोन महिन्यांपासून माहेरी राहत आहे. मलापूर भागात राहणाऱ्या तरूणीचं लग्न सदर भागातील तरूणासोबत झालं होतं. लग्नाच्या 8 महिन्यानंतर दोघांमध्ये वाद झाले.
पती म्हणाला की, जर तिने तंबाखूच्या मंजनने म्हणजे मिशरीने दात घासणं बंद केलं तर तो तिला परत घरी आणेल. पण पत्नी मिशरीने दात घासणं सोडण्यास तयार नाही. काउन्सेलर डॉक्टर अमित गौड म्हणाले की, पत्नी नशेच्या मंजनाने तीन ते चार वेळा दात घासते. ज्यामुळे पतीने तिला घरातून बाहेर काढलं. पतीने पत्नीला तीन तलाक देणार असल्याचं सांगितलं. आता त्यांना पुढील तारखेवर बोलवलं आहे.