Metaverse:मेटाव्हर्सची सुरुवात झाल्यापासून यात लग्न, रिसेप्शन आणि संगीत मैफल यांसारखे कार्यक्रम होत आहेत. पण, आता यात विमान उडवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. काही मीडिया रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. अमेरिकन एअर फोर्सने स्पेसव्हर्ससाठी युनायटेड स्टेट्स पेटंट आणि ट्रेडमार्क कार्यालयाकडे यासाठी ट्रेडमार्क अर्जदेखील दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका या मेटाव्हर्समध्ये आपल्या हवाई दलातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देईल. यूएस एअर फोर्सने दिलेल्या माहितीनुसार, स्पेसवर्सचा वापर अॅक्सटेंडेड रिअॅलिटी ट्रेनिंग, टेस्टिंग आणि ऑपरेशन एनवोर्मेन्टसाठी केला जाणार आहे.
स्पेस व्हर्स म्हणजे काय?Metaverse गेल्या काही काळापासून सतत चर्चेत आहे. याला भविष्यातील तंत्रज्ञान म्हटले जात आहे. कोरोनाच्या काळात व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR), ऑगमेंटेड रिअॅलिटी (AR) आणि ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेस (BCI) वर आधारित हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापरले गेले. जमीन खरेदी करण्यापासून ते संगीत मैफिली आणि लग्नापर्यंत, अनेक कार्यक्रम मेटाव्हर्समध्ये होत आहेत. Spaceverse हे त्याचे एक रूप असेल.
यूएस एअर फोर्सने दाखल केलेल्या पेटंटनुसार, "स्पेसवर्स हे एक सुरक्षित डिजिटल मेटाव्हर्स आहे, जे टेरेस्टेरियल, स्पेस फिजीकल आणि डिजीटल रिअॅलिटीज प्रदान करतो. यात सिंथेटिक आणि सिम्युलेटेड एक्सटेंडेड रिअॅलिटी ट्रेनिंग, टेस्टिंग आणि ऑपरेशन एनवॉर्मेंट मिळेल.'' सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, स्पेसवर्समध्ये अमेरिकन एअरफोर्स ट्रेनिंग करेल.
मेटाव्हर्समध्ये प्रशिक्षण देण्याचे कारण काय?हे तंत्रज्ञान अमेरिकन सैन्याच्या आधुनिकीकरणाचा एक भाग आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये जवळपास दोन महिन्यांपासून युद्ध सुरू असताना अमेरिकेने या तंत्रज्ञानावर काम सुरू केले आहे. सैन्याला स्पेसव्हर्समध्ये अधिक चांगल्या आणि नवीन पद्धतीने प्रशिक्षण दिले जाईल. सैनिकांचे प्रशिक्षण ही एक दीर्घ प्रक्रिया आहे आणि त्यासाठी अनेक महिने लागतात. काही प्रशिक्षण पूर्ण होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतो. मेटाव्हर्सच्या माध्यमातून अमेरिकन हवाई दलाचा बराच वेळ वाचू शकतो.