अजमेर: राजस्थानच्या अजमेरमध्ये एक अजब घटना घडली आहे. मसूदा परिसरातल्या नाडी भागत असलेल्या जंगलातले बिबट्याचे ४ बछडे रस्ता चुकल्यानं गावापर्यंत पोहोचले. गावातील लहान मुलांनी बछड्यांना पाहिलं. त्यांना ते मांजरेसारखे दिसले. त्यामुळे लहान मुलांनी बछड्यांना कुशीत घेतलं. त्यांच्यासोबत खेळू लागले. बछड्यांसोबत काढलेले फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. बच्चे कंपनी या बछड्यांना घेऊन घरी आली. बछड्यांना पाहून मुलांचे कुटुंबीय घाबरले. त्यांनी बछड्यांना पुन्हा सोडून येण्यास सांगितलं.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बिबट्याचे बछडे फिरत फिरत गावाजवळ आले होते. लहान मुलांना ते मांजरीसारखे दिसले. त्यामुळे मुलं त्यांच्यासोबत खेळू लागली. बछड्यांना कुशीत घेऊन त्यांनी फोटोदेखील काढले. थोड्या वेळानं बछड्यांना घेऊन मुलं घरी गेली. त्यावेळी कुटुंबियांच्या पायाखालील जमीनच सरकली.
बछड्यांची माहिती मिळताच वन विभाग कामाला लागला. वनपाल मुकेश मीणा यांनी जंगलात अनेक ठिकाणी बछड्यांचा शोध घेतला. मात्र त्यांचा ठावठिकाणा समजू शकला नाही. या परिसरात अनेकदा बिबटे आढळून येतात. या भागात अनेकदा बिबटे फिरत असतात. काही वेळा ते जनावरांवर हल्ले करतात अशा तक्रारी ग्रामस्थांकडून अनेकदा वन विभागाला करण्यात आल्या आहेत.