मुंबई : मुंबईतील एका व्यक्तीने आपल्या आजीसाठी ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनवरून फोन मागविला. मात्र, या फोनचे पार्सल त्या व्यक्तीपर्यंत पोहोचलेच नाही. त्यामुळे संतापलेल्या या व्यक्तीने थेट अमेरिकेत राहणारे अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस यांना ईमेल पाठविला.
दरम्यान, मुंबईतील या व्यक्तीने पाठविलेला हा मेल जेफ बेझोस यांनी फक्त वाचलाच नाही तर त्यांनी त्वरित अॅमेझॉनच्या टीमला ही समस्या सोडवण्यासाठी सूचना दिली. त्यानंतर अॅमेझॉनच्या कर्मचार्यांनी काही दिवसातच या व्यक्तीशी संपर्क साधला आणि समस्या सोडविली.
मुंबईच्या ओंकार हणमंते असे या व्यक्तीचे नाव आहे. ओंकार हणमंते यांनी अॅमेझॉनच्या वेबसाइटवरून आपल्या आजीसाठी फोन ऑर्डर केली. नोकियाचा बेसिक फोन त्यांनी मागविला होता. मात्र, त्यांना बरेच दिवस फोनची डिलिव्हरी मिळाली नाही. पण, अॅमेझॉनच्या वेबसाइटवर त्यांना स्टेटस फोन डिलिव्हरी झाल्याचे दिसून येत होते.
"मी आपल्या ग्राहक सेवा आणि डिलिव्हरी व्यवस्थेमुळे खूप निराश आहे. मी अॅमेझॉनकडून जो फोन ऑर्डर केला आहे, पण त्याची डिलिव्हरी माझ्यापर्यंत झाली नाही आणि पार्सल माझ्या सोसायटीच्या गेटवर ठेवला होता, पण ते तेथून चोरीला गेले. मला या डिलिव्हरीबद्दल कॉल सुद्धा आला नाही. विशेष म्हणजे, यावर आपली कस्टमर सर्व्हिस टीम चौकशी सुरू आहे, असे सांगत सतत खोचक उत्तरं देत होती," अशा आशयाचे पत्र ओंकार हणमंते यांनी जेफ बेझोस यांनी पाठविले.
ज्यावेळी या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यावेळी सीसीटीव्ही फुटेजवरून असे दिसून आले की, डिलिव्हरी मॅनने ओंकार हणमंते यांना फोनचे पार्सल देण्याऐवजी सोसायटीच्या एन्ट्री गेटवर ठेवले. यानंतर, एक व्यक्तीने गेटवर ठेवलेल्या या फोनची चोरी केली. ही चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली.
दरम्यान, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अॅमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेझोस यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, ते अद्याप आपल्या ग्राहकांचे मेल वाचतात. जर त्यांना थेट उत्तर देता येत नसेल तर ते संबंधित विभागाकडे पाठवतात.