आयुष्यात कधी तुमचं नशीब बदलेल हे सांगता येत नाही. रातोरात स्टार बनणारे, गरिबीतून श्रीमंत बनणारे तुम्ही पाहिले असतील. अशीच काहीशी घटना पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या शेख हिरासोबत घडली आहे. अत्यंत गरीब परिस्थितीत जगणारा शेख हिरा हा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी रुग्णवाहिका चालवतो. मात्र हा रुग्णवाहिका चालक शेख हिरा आता कोट्यधीश झाला आहे.
पश्चिम बंगालमध्ये राहणारा रुग्णवाहिका चालक शेख हिरा याचं आयुष्य एका लॉटरीच्या तिकिटामुळे बदललं आहे. सकाळी २७० रुपयांची लॉटरी खरेदी केली आणि दुपारपर्यंत तो कोट्यधीश बनला आहे. हे स्वप्न नसून वास्तव आहे. सकाळी शेख हिरानं २७० रुपयांची लॉटरी काढली आणि दुपारी या लॉटरीचा निकाल कळाला. तेव्हा १ कोटींचा जॅकपॉट शेख हिराला लागला होता. जिंकलेल्या लॉटरीच्या रक्कमेतून तो त्याच्या आईवर चांगल्या रुग्णालयात उपचार करणार असून एक मोठं घरही बनवणार असल्याचं तो म्हणतो.
...अन् शेख थेट पोलीस ठाण्यात पोहचला
रिपोर्टनुसार, शेख हिरा पश्चिम बंगालच्या पूर्व बर्धमान जिल्ह्यातील राहणारा आहे. जेव्हा त्याला १ कोटींची लॉटरी लागली तेव्हा तो इतका घाबरला की, थेट पोलीस स्टेशन गाठलं. शेखच्या मनात लॉटरी कुणीतरी हिसकावून घेण्याची भीती होती. त्यानंतर पोलिसांनीही शेख हिराला संरक्षण देत घरापर्यंत आणलं आणि त्याच्या घराबाहेर पोलिसांचे एक पथकही तैनात ठेवले.
आता आई लवकरच ठीक होईल
शेखची आई खूप आजारी असते. त्यांच्या उपचारासाठी पैशांची नितांत गरज होती. अचानक नशीब चमकल्यामुळे रुग्णवाहिका चालकाला त्याची आई लवकरच बरी होईल असा विश्वास वाटतो. मी नेहमी जॅकपॉट लागेल असं स्वप्न पाहायचो म्हणून लॉटरी तिकीट खरेदी करत होतो. अखेर माझ्या नशिबाचं दार उघडलं. या लॉटरीमुळे माझी आर्थिक समस्या दूर होणार आहे. आईला चांगला उपचार मिळेल आणि मी मोठं घर बांधेन त्याव्यतिरिक्त अद्याप काही विचार केला नाही. शेख हिराला तिकीट विकणारा लॉटरी विक्रेता बेशेख हनीफ यांनीही जॅकपॉट विनरला त्याच्या दुकानातून खरेदी केलेल्या तिकीटावर लॉटरी लागल्याने खूप आनंदित असल्याचं दिसून आले.