लहान मुलं सर्वांनाच आवडतात. लग्न झाल्यानंतर प्रत्येक कपलला आपण आई-वडील व्हावं अशी इच्छा असते. पण तुम्हाला जर कोणी एका जोडप्याने 16 मुलांना जन्म दिल्याचं सांगितलं. तर तुमचा विश्वासच बसणार नाही किंवा हे खोटं वाटेल. पण हो हे खरं आहे. अमेरिकेत ही अजब घटना घडली आहे. एका कपलने एक-दोन नव्हे तर तब्बल 16 मुलांना जन्म दिला आहे आणि आता 17 व्या बाळाची तयारी करत आहेत. इतकंच नव्हे तर या मुलाचं त्यांनी नावही ठरवलं आहे,
द मिररमधील वृत्तानुसार, अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिनामध्ये राहणारी 40 वर्षांची पॅटी हर्नांडेज आणि तिचा 39 वर्षांचा नवरा कार्लोस या कपलला 16 मुलं आहेत. इतक्या मुलांचे आईवडील होऊनही ते आता सतराव्या मुलासाठी ते प्रयत्न करत आहेत. आपण पुन्हा प्रेग्नंट होऊ असा विश्वास पॅटीला आहे. या कपलच्या सर्व मुलांची नावं सी अक्षराने सुरू होतात कारण त्यांच्या वडिलांचं नावही याच अक्षरावरून सुरू होतं. त्यामुळे होणाऱ्या बाळाचं नावही याच अक्षरावरून ठेवणार आहेत.
(फोटो - झी न्यूज)
पॅटीने "आम्ही सतराव्या बाळासाठी प्रयत्न करत आहोत. आम्हाला नेहमीच एक मोठं कुटुंब हवं होतं पण कधी वाटलं नव्हतं की देव आम्हाला इतका आशीर्वाद देईल. मी पुन्हा प्रेग्नंट होईल असा मला विश्वास आहे कारण माझा देवावर विश्वास आहे. आम्ही देवाची इच्छा पूर्ण करत आहोत आणि जर त्यांची इच्छा असेल तर त्यांनी आमच्या कुटुंबाचा आणखी विस्तार करावा अशी प्रार्थना आम्ही करतो" असं म्हटलं आहे.
सतराव्या मुलांचं नावही त्यांनी ठरवलं आहे. 'जर तो मुलगा असेल तर कार्टर आणि मुलगी असेल तर क्लेअर असं नाव ठेवणार आहोत', असं पॅटीने सांगितलं. या कपलने तीन वेळा जुळ्या मुलांना जन्म दिला. कार्ला-कॅटलिन, केल्व्हिन-कॅथरीन, कालेब-कॅरोलिन अशी त्यांची नावं. तर इतर मुलांची नावं क्रिस्टोफर, क्रिस्टियन, सेलेस्टे, क्रिस्टिना, कॅरल, कॅमिला, चार्लोट आणि क्रिस्टल अशी आहेत. पॅटीने गेल्या वर्षी मे महिन्यात आपला 16 वा मुलगा क्लेटनला जन्म दिला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.