प्रेमाला जात, धर्म काहीही नसतं... कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं... आतापर्यंत आपण अनेक प्रेमाच्या गोष्टी ऐकल्या असतील.. पण आज आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहोत, एक अशी गोष्टी जी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. गोष्ट आहे न्यूयॉर्क शहरातील... या शहरातील एक भारतीय आणि एक पाकिस्तानी मुलगी सर्व चौकटी आणि बंधनं मोडून सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनल्या आहेत. या दोघींनी समलैंगिकतेबद्दल असलेले अनेक समज-गैरसमज तर मोडीत काढलेच आहेत, पण त्याचसोबत जातीपातीच्या सर्व सीमा पार करून या दोघी आपल्या नात्याचा एक भक्कम पाया रचत आहेत. या दोघींपैकी एक हिंदू आहे तर दुसरी मुस्लीम, एक भारतीय आणि दुसरी पाकिस्तानी. एकीचं नाव आहे संदस मलिक आणि दुसरीचं अंजली चक्र.
संदस एक आर्टिस्ट आहे. ती पाकिस्तानातील एका मुस्लीम कुटुंबातून आहे. तेच अंजली भारतीय आहे. या दोघींनी काही दिवसांपूर्वी एक फोटोशूट केलं आहे. या दोघींचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.
दोघींचे व्हायरल होणारे फोटो सरोवर नावाच्या एका फोटोग्राफरने क्लिक केले आहेत. या दोघींच्या चार-चार फोटोंचे दोन सेट आहेत, जे व्हायरल होत आहेत. पहिल्या एका सेटमध्ये या दोघी एका पारदर्शी छत्री घेऊन उभ्या आहेत आणि एकमेकींकडे पाहत आहेत. पावसामध्ये क्लिक करण्यात आलेले या दोघींचे हे फोटो खरचं फार सुंदर आहेत. फोटोग्राफर सरोवर ने ट्विटरवर हे फोटो शेअर करत कॅप्शन दिलं आहे की, 'ए न्यूयार्क लव स्टोरी'
दरम्यान, या दोघीही एका वर्षापासून रिलेशनमध्ये आहेत आणि याच निमित्ताने या दोघींनी आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले तर ते लगेच व्हायरल झाले आहेत.
दोघींनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर केले आहेत. संदसने फोटो शेअर करताना लिहिलं आहे की, मी नेहमीच प्रेमाकडे वेगळ्या नजरेतून पाहिलं आहे. पण मी जेव्हा मोठी झाले तेव्हा मला स्वतःबाबत समजलं. पण तोपर्यंत मी माझ्यासारख्या लोकांचं प्रेम पाहिलं नव्हतं. मला खरचं आनंद आहे की, मला माझं प्रेम मिळालं. सालगिरह मुबारक बेबीजान'
अंजलीने ट्विट करत असं लिहिलं आहे की, त्या मुलीला माझ्या शुभेच्छा आहेत, जिने मला प्रेम काय आहे ते शिकवलं. सोशल मीडियावर या दोघींच्या फोटोंच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच लोक यांना अनेक शुभेच्छाही देत आहेत.