वॉशिंग्टन: तुम्ही अनेक यशस्वी चोरीच्या घटना ऐकल्या असतील. पण, अमेरिकेत एका चोराने केलेलं कृत्य ऐकून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही. या चोरीच्या घटनेने अमेरिकेतील पोलिसही चक्रावून गेले. एका चोराने दिवसाढवळ्या एक बँक लुटली. कॅशीअरला बंदुक दाखवून चोराने बक्कळ बैसे घेऊन पळ काढला आणि तो चोरीत यशस्वी झाला. पण, तोच चोर दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच बँक लुटायला पोहोचला आणि पोलिसांच्या तावडीत सापडला.
कॅशियरला धमकावून लुटली बँक
'न्यूयॉर्क टाइम्स'च्या रिपोर्टनुसार, ही घटना अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील आहे. 33 वर्षीय सॅम्युअल ब्राउनने न्यूहोप स्ट्रीट चेसच्या शाखेत दरोडा घातला. दिवसाढवळ्या कॅशियरला बंदुकीचा धाक दाखवत त्याने मोठ्या प्रमाणावर कॅश घेऊन पळ काढला. दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला होता. यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी मोहिम राबवली. पण, पोलिसांनी चोराला पकडण्याच्या आधीच तो स्वतः पकडला गेला.
पुन्हा तीच बँक लुटण्याचा प्रयत्न केला
चोरी झाल्याच्या दुसऱ्या दिवशी बँकेचे नियमित काम सुरू झाले. पण, दुसऱ्या दिवशी तोच चोर पुन्हा तीच बँक लुटण्याच्या उद्देशाने बँकेत आला. चोराने पुन्हा त्याच कॅशिअरला बंदुकीचा धाक दाखवत पैशांची मागणी केली. पण, यावेळीस कॅशिअर आधीच अलर्ट झाला होता आणि त्याने पोलिसांना कळवले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून सॅम्युअल ब्राऊनला अटक केली. आरोपींनी त्याच बँकेला दुसऱ्यांदा लुटण्याचा प्रयत्न केला हे जाणून स्वतः पोलीस अधिकारी आश्चर्यचकित झाले.