हॉटेलमध्ये वेटरला टीप देणे सामान्य आहे. तुम्हीही अनेकदा वेटरला टीप दिली असेल. पण, एका वेटरला टीप घेणे चांगलंच महागात पडलंय. अमेरिकेतील एका हॉटेलमध्ये एका महिला वेटरला टीप घेतल्यामुळे आपली नोकरी गमवावी लागली. या घटनेची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्या हॉटेलविरोधात संताप व्यक्त होत आहे.
सविस्तर माहिती अशी की, अमेरिकेतील अर्कान्सास राज्यातील एका हॉटेलमध्ये एक व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत जेवायला आला होता. यादरम्यान हॉटेलच्या एका महिला वेटरने त्या सर्वांचे स्वागत केले आणि त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने जेवण दिले. तिच्या आदराथित्यामुळे ते कुटुंब खूश झाले. तिच्याशी बातचीत केल्यानंतर त्या कुटुंबाला समजले की, ती महिला एक विद्यार्थिनी आहे आणि हॉटेलमध्ये अर्धवेळ काम करते. तीची मेहनत पाहून तो व्यक्ती खूश झाला आणि जेवणानंतर त्या महिलेला तीन लाखांहून अधिक रुपयांची टीप दिली. पण, टीप मिळाल्यानंतर त्या हॉटेलच्या मॅनेजरने त्या महिलेला नोकरीवरुन काढले.
नोकरीवरुन का काढले ?फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार, रायन नावाची महिला हॉटेलमध्ये अर्धवेळ काम करायची. एके दिवशी एका व्यक्तीने या महिलेला सुमारे तीन लाखांची टीप दिली. पण, घडलेला प्रकार हॉटेल मॅनेजरला कळल्यावर त्यांने ते पैसे बाकीच्या वेटर्समध्ये विभागण्यास सांगितले. मॅनेजरने यापूर्वी कधीही कोणाला टीप शेअर करण्यास सांगितली नव्हती.
पण, मॅनेजरच्या या मुद्द्यावर ती महिला आश्चर्यचकित झाली आणि पैशांची गरज असल्यामुळे टीप विभागण्यास नकार दिला. यानंतर मॅनेजर आपल्या म्हणण्यावर ठाम राहिला आणि पैसे वाटून घेण्यास सांगितले. पण, महिलेने नकार दिल्यानंतर तिला नोकरीवरुन काढले. ही बाब सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांकडून संताप व्यक्त होत आहे.