मुंबई : देशातील स्मार्ट फोनच्या संख्येत दिवसाकाठी वाढ होत असून या माध्यमातून इंटरनेटचा वापरही मोठ्या प्रमाणावर वाढीस लागत आहे. मात्र, इंटरनेट क्रांतीचा प्रसार भारतात झपाट्याने होत असला तरी नेमकी हीच अमेरिकेच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरली असून पायरसी मोठ्या प्रमाणावर वाढेल अशी भीती आता अमेरिकेने व्यक्त केली आहे.इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन आॅफ इंडियाने नुकत्याच सादर केलेल्या अहवालानुसार, देशातील स्मार्ट फोनची संख्या झपाट्याने वाढत असून २०१५ च्या वर्षात यामध्ये २३ टक्के वाढ अपेक्षित आहे. यामुळे देशातील स्मार्ट फोनची संख्या २१ कोटी ३० लाखांचा टप्पा ओलांडेल, तर याच कालावधीत भारतातील मोबाईल इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या नव्या ३७ कोटी ग्राहकांचा टप्पा ओलांडेल. ज्या प्रमाणात स्मार्ट फोनची संख्या वाढत आहे, त्याच प्रमाणात त्यावरून वापरल्या जाणाऱ्या इंटरनेटच्या प्रमाणातही वाढ होताना दिसत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतात हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर, याच संदर्भात आणि याच धर्तीवर अमेरिकेच्या ट्रेड रिप्रेझेन्टेटिव्ह संस्थेने ३०१ पानी अहवाल प्रसिद्ध केला. यानुसार, पायरसी ही भारतात मोठी समस्या असून, यामुळे डिजिटल विश्वाला मोठा फटका अनेक वेळा बसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. किबंहुना, आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ अलीकडेच प्रदर्शित झालेल्या चित्रपट आणि गाण्यांच्या पायरेटेड पद्धतीने झालेल्या डाऊनलोडिंगची आकडेवारी सादर करताना त्यात भारतच कसा अग्रेसर आहे, हे नमूद केले आहे. पायरसी हा मुद्दा तर आहेच; पण पायरसीसंदर्भातील अनेक न्यायालयीन याचिकांची प्रक्रियाही क्लिष्ट असल्याचे म्हटले आहे. (प्रतिनिधी)
भारतातील वाढत्या इंटरनेटची अमेरिकेला धास्ती
By admin | Published: May 16, 2015 1:06 AM