परतवाडा (अमरावती) - बहिरमच्या यात्रेत लाल रंगाची अंडी घालणारी चिनी कोंबडी विक्रीकरिता दाखल झाली. इलाहाबादवरून रामभाऊ नामक दादाजी आपल्या सहा साथीदारांसह या शेकडो कोंबड्या घेऊन शुक्रवारी दाखल झालेत. कारंजा-बहिरम रस्त्यालगत त्या विक्रीला ठेवल्यात. दोन ते तीन महिन्यांची वाढ झालेले हे पक्षी करड्या रंगाचे आहेत.या पक्ष्यांची पाचशे रूपये जोडी प्रमाणे विक्री केली जात आहे. एक नर, एक मादी अशी जोडी लावली जात आहेत. देशी कोंबड्यांपेक्षा या पक्ष्याचे (चिनी कोंबडीचे) मांस लुसलुसीत आणि रूचकर असल्याचा दावा रामभाऊ दादाजींनी केला आहे. या पक्ष्यांचे मांस गरम असून, जम्मू-काश्मिरसह थंड प्रदेशात अधिक मागणी आहे. अलाहाबादहून मोठ्या प्रमाणात हे पक्षी (चिनी कोंबडी) जम्मू-काश्मिरला पाठविले जात असल्याचेही ते म्हणाले.पाच महिन्यांचे झाल्यानंतर ही चिनी कोंबडी रोज एक अंडी देते. त्याचा रंग लाल असतो. सहा महिन्यांनंतर या कोंबडीचे वजन चार ते पाच किलोपर्यंत वाढते. देशी कोंबडीपेक्षा या कोंबडीची अंडी आकाराने मोठी असते. या कोंबडीला चिनी असूनही देशी गावरान कोंबडीचा भाव मिळतो, असेही त्यांनी सांगितले. ही कोंबडी आपल्या दहा ते पंधरा अंड्यावर बसून उबवते.शुक्रवारला यात्रेत फारशी विक्री झाली नाही. शनिवारला काही प्रमाणात हे पक्षी विकल्या गेलेत. रविवारला ते मोठ्या प्रमाणात विकले जातील. कारंजा-बहिरम रस्त्याच्या कडेला आपली गाडी थांबवून, पायी चालणारे आपले चालते पाय थांबवून या पक्षांकडे कुतुहलाने बघत होते. चौकशी करीत होते. बहिरमच्या यात्रेत अनेक चिनी वस्तू विक्रीला आहेत. त्या देशी वस्तूपेक्षा कितीतरी स्वस्त आहेत. पण, चिनी कोंबड्या मात्र देशी कोंबडीपेक्षाही जादा भावाने विकले जात होते.
बहिरमच्या यात्रेत लाल रंगाची अंडी देणारी कोंबडी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 7:36 PM