लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: वीस दिवसांपूर्वी म्हणजे १६ मार्चला खगाेलशास्त्रज्ञांनी शाेधलेला एक लघुग्रह गुरुवारी ६ एप्रिलला पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. त्याचा आकार ९० हत्तींच्या आकाराएवढा आहे. पण पृथ्वीवासीयांना घाबरण्याची गरज नाही कारण ताे ३० लाख किलाेमीटर दूरवरून जात असेल, अशी माहिती खगोल अभ्यासकांनी दिली आहे.
शास्त्रज्ञांनी ‘२०२३ एफएम’ असे नाव या लघुग्रहाला दिले आहे. अशीच एक उल्का बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे ५० हजार वर्षांपूर्वी पडून विनाश झाला होता, असे चंद्रपूरचे खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपने सांगतात. ‘२०२३ एफएम’ हानीकारक नसला तरी नासाने शोधलेला दुसरा एक लघुग्रह वैज्ञानिकांसाठी चिंतेचे कारण ठरला आहे. त्याचे नाव ‘२०२३ डिडब्ल्यू’ आहे. तो ५० मीटर व्यासाचा म्हणजे ऑलिम्पिकच्या जलतरण तलावाएवढा आहे. ‘एफएम’ पेक्षा लहान असला तरी ताे धाेकादायक ठरण्याची शक्यता आहे. हा लघुग्रह २०४६ च्या व्हॅलेंटाईनच्या दिवशी पृथ्वीच्या जवळून जाईल, असे वैज्ञानिकांनी नमूद केले आहे.
१६ किलोमीटर प्रतिसेकंद वेग
- ‘२०२३ एफएम’ लघुग्रह १६ किलोमीटर प्रतिसेकंद वेगाने पृथ्वीजवळून भ्रमंती करत आहे.
- पृथ्वी व चंद्र गुरुत्वाकर्षणाद्वारे लघुग्रहाला खेचण्याचा प्रयत्न करू शकते.
- चंद्राच्या गुरुत्वकर्षांमुळे लघुग्रहाची दिशा भरकटण्याची चिन्हे आहेत.
- हा लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास दोन किलोमीटर परिसरात पोहचू शकते.