आपल्या जेवणाचा डब्बा आत्ता फॅशनेबल होऊ लागलाय पण अनेक वर्षांपासून आपल्या देशात एकावरएक लावला जाणारा जेवणाचा डब्बाच वापरला जात होता आणि अजूनही वापरला जातो. असाच स्टीलचा डबा पुन्हा दिसला तोही थेट अमेरिकेत. खुद्द आनंद महिंद्रा यांनीच हा फोटो ट्वीट केलाय. हा फोटो पाहताच प्रत्येक भारतीयाला आपले जुने बालपणीचे दिवस आठवतील.
आपल्यापैकी अनेकजण शाळेला जाताना, कामावर जाताना हातात हा स्टीलचा एकावरएक डबे रचलेला असा जेवणाचा डबा घेऊन जात असतील. त्यावेळी काही आजच्यासारख्या पिशव्या किंवा स्पेशल टिफिन बॉक्स नव्हते. हा डबा हातातच घेऊन अनेक कष्टकरी आपल्या कामाची वाट धरायचे. हा डबा भाजी अंगावर सांडू न देता उघडण्याचे कसबही प्रत्येकाने आत्मसात करून घेतले होते. या एका डब्यात दुपारचे संपूर्ण जेवण राहायचे. पोळी, भाजी, भात, आमटी या डब्यात सहज फिट बसत.
आनंद महिंद्रांच्या या फोटोमुळे अनेकांच्या या आठवणी ताज्या झाल्या. त्यातही हा डबा अमेरिकेतील न्यु यॉर्कमध्ये दिसल्याने अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. आनंद महिंद्रा यांनी कॅप्शनही सुंदर दिलीय, ते म्हणतात, 'न्यु यॉर्क, सेंट्रल पार्क, डब्बावाली'.
मुंबईच्या डब्बेवाल्यांकडे हा डबा आजही हमखाास दिसतो. अनेकांनी या फोटोखाली कमेंटकरताना पाश्चिमात्य देश भारतीय संस्कृती स्वीकारत असल्याचे म्हणतं फोटोचे कौतुकही केले आहे.