मुंबई: सध्याचा काळ हा इलेक्ट्रीक व्हेईकल्सचा आहे. बाजारात इंधनावर आणि बॅटरीवर चालणाऱ्या अनेक अत्याधुनिक चारचाकी गाड्या उपलब्ध आहेत. पण, या गाड्यांच्या गगनाला भिडणाऱ्या किमती असल्यामुळे अनेकांना त्या घेणे परवडणारे नाही. पण, महाराष्ट्रातील एका अवलियाने नवीन चारचाकी घेणे परवडत नसले, तरी चारचाकी गाडीत फिरण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. त्याने नवीन किंवा सेकंड हँड चारचाकी गाडी विकत घेतली नाही, तर स्वतः भंगारातून एक चारचाकी गाडी तयार केली आहे.
आनंद महिंद्रा देणार नवीकोरी बोलेरोउद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर या गाडीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत खुद्द आनंद महिंद्रा यांनी त्या व्यक्तीचे कौतुक केले आहे. तसेच, या व्यक्तीला नवीन बोलेरो देणार असल्याचे म्हटले. व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये आनंद महिंद्रा यांनी लिहीले की, 'हे कोणत्याही नियमाशी जुळत नाही, पण, मी आमच्या लोकांच्या कल्पकतेचे आणि क्षमतेचे कौतुक करणे कधीही थांबवणार नाही.
'ती गाडी चालवून व्यक्तीने नियमांचे उल्लंघन केले आहे, त्यामुळे कधी ना कधी स्थानिक अधिकारी त्या व्यक्तीला ते वाहन चालवण्यापासून रोखतील. पण, या वाहनाच्या बदल्यात मी त्याला वैयक्तिकरित्या बोलेरो गाडी देईन. त्याची ही गाडी इतरांना प्रेरणा देण्यासाठी MahindraResearchValley मध्ये प्रदर्शनासाठी ठेवली जाऊ शकते.' आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिले गेला आहे.
भंगारातून तयार केली चारचाकीसांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात राहणाऱ्या एका अल्पशिक्षित व्यक्तीने दुचाकी आणि चारचाकी गाड्यांच्या सुट्या/भंगार भागांपासून एक चारकाची गाडी बनवली आहे. अवघ्या दोन महिन्यात तयार झालेल्या या गाडीला त्याने 'जुगाड जिप्सी' असे नाव दिले आहे. कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे गावात राहणाऱ्या दत्तात्रय लोहार यांनी ही जुगाड जिप्सी तयार केली आहे. ही चारचाकी गाडी बनवण्यासाठी त्यांना अवघा 50 ते 60 हजारांचा खर्च आला. विशेष म्हणजे, जीप गाडीची प्रतिकृती असलेली ही जुगाड जिप्सी मोटारसायकप्रमाणे किक मारुन स्टार्ट होते.
दुचाकी आणि चारचाकीचे मिश्रणदत्तात्रय लोहार यांचे देवराष्ट्रे या गावात फॅब्रिकेशनचे एक छोटेशे वर्कशॉप आहे. अनेकांना घरात चारचाकी गाडी असावी वाटते, दत्तात्रय यांनाही घराच चारचाकी असावी, अशी इच्छा होती. पण, आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना नवीन गाडी घेणे परवडणारे नव्हते. पण, घरापुढे चारचाकी उभी रहावी, या जिद्दीने पेटलेल्या दत्तात्रय यांनी घरातील भंगार दुचाकीचे इंजिन, जीवचे बोनेट आणि रिक्षाची चाके वापरुन ही जुगाड जिप्सी तयार केली आहे.
मायलेजमध्ये नंबर वनया जिप्सीचे वैशिष्ट्ये म्हणजे, ही गाडी ताशी पन्नास किलोमीटर वेगाने धावते आणि एका लिटर पेट्रोलमध्ये 40-45 किलोमीटरचे मायलेज देते. या जिप्सीमध्ये चार माणसे बसू शकतात. या गाडीत बटन स्टार्टऐवजी किक देण्यात आली आहे आणि गाडीचे स्टेअरिंग इतर चारचाकीप्रमाणे उजव्या बाजुला नसून, डाव्या बाजुला आहे.