नवी दिल्ली - देशात सध्या कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र याच दरम्यान काही हटके घटनाही समोर येत आहेत. काही लोकांना टीव्ही पाहण्याचं प्रचंड वेड असतं. मालिका, चित्रपट, शो पाहण्यात ते तासन् तास मग्न असतात. मालिका पाहण्याच्या नादात आजुबाजूला काय होतं असतं याचं देखील अनेकांना भान नसतं. अशीच एक आंध्र प्रदेशमध्ये घडली आहे.
आंध्र प्रदेशमध्ये एका रुग्णाची ओपन ब्रेन सर्जरी करायची होती. मात्र ऑपरेशनच्या वेळी रुग्णाला झोपायची परवानगी नव्हती अशा परिस्थितीत डॉक्टरांनी अनोखी शक्कल लढवली. रुग्णाला त्याचा आवडता टीव्ही शो 'बिग बॉस' आणि हॉलिवूड चित्रपट 'अवतार' दाखवला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रुग्ण या गोष्टी लॅपटॉपवर पाहत असेपर्यंत शस्त्रक्रिया करण्यात आली.
शस्त्रक्रियेवेळी रुग्णाला बेशुद्ध करायचे नव्हतं
मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशमधील गुंटूर ही घटना घडली आहे. 'इंडिया टुडे' च्या रिपोर्टनुसार, वारा प्रसाद असं या रुग्णाचं नाव आहे. न्यूरो सर्जन यांना शस्त्रक्रियेवेळी रुग्णाला बेशुद्ध करायचे नव्हतं. ओपन ब्रेन शस्त्रक्रियेद्वारे वाराच्या मेंदूत डाव्या बाजूला असलेल्या प्रीमोटर क्षेत्रातील ग्लिओमा काढून टाकायचा होता. यासाठी डॉक्टरांनी त्याला शस्त्रक्रिया संपेपर्यंत लॅपटॉपवर बिग बॉस आणि अवतार सिनेमा दाखवला आहे.
वारा प्रसादची शस्त्रक्रिया यशस्वी
2016 मध्ये याआधी वारा प्रसादवर शस्त्रक्रिया झाली होती. माात्र हैदराबादमध्ये झालेल्या या शस्त्रक्रियेनंतर तो पूर्णपणे बरा झाला नव्हता. अशा परिस्थितीत डॉ. बी. एच. श्रीनिवास रेड्डी, डॉ. शेषाद्री शेखर आणि डॉ. त्रिनाध यांच्या टीमने पुन्हा गुंटूर येथे त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. वारा प्रसादची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.